Latest

IND vs ENG 2nd Test : दुसर्‍या कसोटीत इंग्लंडचा काय आहे गेम प्लॅन?

Shambhuraj Pachindre

विशाखापट्टणम; वृत्तसंस्था : पहिल्या कसोटीतील विजयानंतर इंग्लंडचा आत्मविश्वास प्रचंड उंचावला असून, गरज वाटल्यास दुसर्‍या कसोटी सामन्यात आम्ही चार फिरकी गोलंदाज खेळवणार असल्याचा गेम प्लॅन इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम याने सांगितला आहे. (IND vs ENG 2nd Test)

व्हिसाच्या समस्येचे निराकरण झाल्यानंतर ऑफ-स्पीनर शोएब बशीर हैदराबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या संघात सामील झाला आणि मॅक्युलमने संकेत दिले की, ते 2 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या दुसर्‍या कसोटीत त्यांचे सर्व चार फिरकीपटू खेळतील. तो म्हणाला, शोएब अबुधाबीच्या शिबिरात आमच्यासोबत होता आणि त्याच्या कौशल्याने आम्ही खरोखर प्रभावित झालो आहोत. टॉम हार्टलीसारखा प्रथम श्रेणीचा अनुभव त्याच्याकडे कमी आहे; पण त्याचे कौशल्य आम्हाला येथे मदत करू शकेल, असे आम्हाला वाटते. तो योग्य वेळी आला. जर विशाखापट्टणमची खेळपट्टी अधिक वळणारी असेल, तर आम्ही सर्व फिरकीपटू खेळण्यास घाबरणार नाही, असे मॅक्युलमने स्पष्ट केले. (IND vs ENG 2nd Test)

त्याने पुढे म्हटले, जेव्हा आम्ही टॉमची निवड केली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या; पण हे विसरू नका की, थोडकेच प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेल्या नॅथन लियॉनला संधी मिळाली आणि त्याने ऑस्ट्रेलियासाठी काय कमाल करून दाखवली. जेव्हा तुम्ही पुरेसे चांगले खेळाडू पाहता आणि परिस्थिती त्यांना अनुकूल असेल तेव्हा त्यांना संधी द्यायला हवी. अशा गोष्टींबद्दल तुम्हाला तुमच्या निर्णयाचे समर्थन करावे लागेल. बेन स्टोक्सने ज्याप्रकारे त्याला हाताळले आणि भारतीय फलंदाजांनी दबावाखाली आणले असतानाही त्याच्यावर विश्वास दाखवला, हे महत्त्वाचे होते. मला वाटले की, हे नेतृत्वाचे खरे लक्षण आहे.

इंग्लंडच्या संघाने हैदराबाद कसोटीत यजमान भारतावर रोमहर्षक विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पदार्पणवीर टॉम हार्टली याने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय फलंदाजांना फिरकीच्या तालावर नाचवले. त्याने सात विकेटस् घेऊन इंग्लंडला 28 धावांनी विजय मिळवून दिला. पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या हार्टलीने दुसर्‍या डावात 62 धावांत 7 बळी टिपले. 231 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारा भारतीय संघ 202 धावांवर गारद झाला. आता भारत-इंग्लंड यांच्यातली दुसरी कसोटी 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे सुरू होणार आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT