Latest

Ind vs Ban Test : उमेश-अश्विनने बांगला देशला 227 धावांत गुंडाळले

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी केलेल्या टीच्चून मा-याच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव 227 धावांवर गुंडाळला. यादवने 15 षटकात 25 धावा देत 4 बळी घेतले, तर अश्विननेही 71 धावांत 4 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तसेच 12 वर्षांनी कसोटी संघात पुनरागमन करणा-या उनाडकटने 16 षटकात 50 धावा देऊन 2 विकेट्स मिळवल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात एकही विकेट न गमावता 19 धावा केल्या. कर्णधार केएल राहुल (3*) आणि शुभमन गिल (14*) क्रीजवर आहेत.

नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय कर्णधार राहुलने मोहम्मद सिराज आणि उमेश यादवसह गोलंदाजीची सुरुवात केली आणि नवव्या षटकात पहिला बदल म्हणून उनाडकटकडे चेंडू सोपवला. कर्णधाराने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत उनाडकटने ढगाळ वातावरणाचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने शांतो आणि झाकीर या दोघांनाही आपल्या इनस्विंगने घाम फोडला. 14 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर झाकीरला (15) पॉइंटवर उभ्या असलेल्या केएल राहुल करवी झेलबाद करून उनाडकटने कसोटीतील पहिल्या बळीची नोंद केली. पुढच्याच षटकात अश्विनने शांतोला (24) आपल्या जाळ्यात अडकवले. शांतो एलबीडब्ल्यू होऊन तंबूत परतला. याचबरोबर यजमान संघाचे दोन्ही सलामीवीर 39 धावसंख्येवर बाद झाले. पण, त्यानंतर कर्णधार शाकिब आणि मोमिनुल हकने डाव सांभाळला. सामन्याचे पहिले सत्र संपेपर्यंत दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. उपहारानंतर उमेश यादवच्या गोलंदजीला धार आली. त्याने शाकिबला (16) बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. पुजाराने बांगला देशी कर्णधाराचा झेल पकडला.

82 वर तीन गडी गमावल्यानंतर मोमिनुल हकने मुशफिकर रहीमच्या जोडीने संयमी पवित्रा घेत संघाचा धावफलक हलता ठेवला. पण उनाडकटने ही भागीदारी तोडून रहीमला (26) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यष्टीरक्षक ऋषभ पंतने रहिमचा झेल पकडला. यावेळी बांगला देशची धावसंख्या 4 बाद 130 अशी होती. यानंतर मैदानात उतरलेल्या लिटन दासने (25) आक्रमक फलंदाजी करत दोन चौकार आणि एक षटकार ठोकला पण अश्विनच्या फुल लेन्थ बॉलवर फ्लिक करण्याच्या प्रयत्नात तो केएल राहुलच्या हाती झेल देऊन बाद झाला. याचबरोबर यजमानांचा निम्मा संघ 172 धावांत माघारी परतला. या दरम्यान, मोमिनुल एक टोक सांभाळत संयमी फलंदाजी करत राहिला, पण दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत होत्या. यावेळी उमेशने मेहिदी हसन मिराज (15), नुरुल हसन (6), तस्किन अहमद (1) यांना बाद करून बांगला देशला खिंडार पाडले. तर आश्विनने मोमिनुल (84 धावा) आणि खालेद अहमद (0) यांचा अडसर दूर करून बांगला देशी संघ 227 धावांत गारद केला.

पहिले सत्र : 82 धावा करताना यजमानांच्या 2 विकेट पडल्या

पहिल्या दिवसाचे पहिले सत्र संमिश्र झाले. यामध्ये बांगलादेशी संघाने 82 धावा जोडल्या तर भारतीय संघाच्या गोलंदाजांनी 2 बळी घेतले. एका क्षणी बांगलादेशचे दोन्ही सलामीवीर 39 धावांवर बाद झाले होते. पण, त्यानंतर कर्णधार शाकिब आणि मोमिनुल हकने डाव सांभाळला. सत्र संपेपर्यंत दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली.

दुस-या सत्रात 102 धावा, 3 विकेट्स

दिवसाचे दुसरे सत्र भारतीय गोलंदाजांनी गाजवले. यामध्ये बांगलादेशने 102 धावा केल्या, पण तीन महत्त्वपूर्ण विकेट्सही गमावल्या. यादरम्यान, मोमिनुलने आपले 16 वे अर्धशतक झळकावून नाबाद राहिला. तर शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम आणि लिटन दास बाद झाले.

मोमिनुलने कसोटीत 27व्यांदा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 9 शतकांचा समावेश आहे. त्याने बांगलादेशच्या हबीब-उल-बशर (27) च्या सर्वाधिक 50+ स्कोअरची बरोबरी केली. बांगलादेशसाठी तो चौथा सर्वाधिक 50+ धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्याआधी तमीम इक्बाल (41), शाकिब अल हसन (35) आणि मुशफिकर रहीम (34) यांचा क्रमांक लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT