पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्याचा आज (दि. 9) तिसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाच्या 469 धावांच्या प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला. यासह ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावाच्या आधारे 173 धावांची आघाडी घेतली आहे. दुस-या डावात कांगारूंची धावसंख्या 36.3 षटकांत 4 बाद 111 झाली असून त्यांनी 284 धावांची आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 31व्या षटकात 86 धावांवर तिसरा धक्का बसला. स्टीव्ह स्मिथने रवींद्र जडेजाच्या चेंडूवर मोठा फटका मारला आणि चेंडू हवेत उंच गेला. पॉइंट्सवरून धावत येत शार्दुल ठाकूरने हा झेल टिपला. स्मिथने तीन चौकारांसह 47 चेंडूत 34 धावा केल्या. स्मिथ आणि लबुशेन यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी झाली.
दुसऱ्या डावात 24 धावांवर ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला. उमेश यादवने उस्मान ख्वाजाला यष्टिरक्षक श्रीकर भरतकरवी झेलबाद केले. उस्मानला दुसऱ्या डावात 13 धावा करता आल्या. पहिल्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही.
डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या डावात चालला नाही. त्याने पहिल्या डावात 43 धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने त्याला आपला बळी बनवले. केएस भरतने वॉर्नरचा विकेटच्या मागे झेल घेतला. वॉर्नर आठ चेंडूत एक धाव काढून बाद झाला.
भारताकडून अजिंक्य रहाणेने 89 आणि शार्दुल ठाकूरने 51 धावा केल्या. रवींद्र जडेजानेही 48 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने तीन बळी घेतले. स्कॉट बोलँड, कॅमेरॉन ग्रीन आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. नॅथन लायनने एक विकेट घेतली. दुसऱ्या डावात चांगली धावसंख्या उभारल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ भारतीय संघाला चौथ्या दिवशी पुन्हा फलंदाजीसाठी आमंत्रित करू इच्छितो. त्याचबरोबर कांगारू संघाला छोट्या धावसंख्येवर गुंडाळण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
मिचेल स्टार्कने शॉर्ट लेन्थ बॉल टाकला, जो शमीला फाइन लेगच्या दिशेने खेळायचा होता, पण चेंडू थोडासा बॅटची कड घेऊन विकेटच्या मागे गेला. कॅरीने त्याच्या डावीकडे झेप घेतली आणि कॅच पकडला.
शार्दुलला कॅमेरून ग्रीनने ऑफ स्टंपच्या चांगल्या लांबीच्या चेंडूवर बाद केले. चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टिरक्षक कॅरीच्या ग्लोव्हजमध्ये गेला.
पॅट कमिन्सने चांगल्या लांबीचा आऊट स्विंगर टाकला, ज्यावर उमेश यादवने शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण तो बाद झाला.
261 धावांच्या स्कोअरवर भारताची सातवी विकेट पडली. अजिंक्य रहाणे 129 चेंडूत 89 धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार मारला. पॅट कमिन्सने त्याला कॅमेरून ग्रीनकडे झेलबाद केले.
रहाणेने WTC Final मध्ये सामन्यात शानदार फलंदाजी करत कसोटी कारकिर्दीतील 5000 धावा पूर्ण केल्या. त्याने शार्दुल ठाकूरसोबत शतकी भागीदारी करून भारतीय संघाचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियाच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे दोन्ही खेळाडूंना जीवदानही मिळाले.
अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांच्यात सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली आहे. रहाणेने आपले अर्धशतक तर शार्दुलने अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. या दोघांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे भारताची धावसंख्या सहा गड्यांच्या मोबदल्यात 250 धावांच्या पुढे गेली.
अजिंक्य रहाणेने पॅट कमिन्सला षटकार ठोकून 92 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याचे कसोटीतील हे 26 वे अर्धशतक आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे टीम इंडियाची धावसंख्या 200 धावांच्या जवळ पोहोचली आहे.
शार्दुल ठाकूरला दोन जीवदान मिळाले. शुन्यावर असताना उस्मान ख्वाजाने त्याचा झेल सोडला. यावेळी तो फक्त चौथा चेंडू खेळत होता. यानंतर आठ धावांच्या स्कोअरवर ग्रीनने त्याला जीवदान दिले.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच भारताला मोठा धक्का बसला. केएस भरत 15 चेंडूत पाच धावा करून बाद झाला. स्कॉट बोलंडने त्याला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर शार्दुल ठाकूर मैदानात उतरला.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात ऑस्ट्रेलियन संघाला पहिला धक्का दिला. त्याने उस्मान ख्वाजाला यष्टिरक्षक केएस भरतकरवी झेलबाद केले. ख्वाजाला खातेही उघडता आले नाही. दोन धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने मार्नस लॅबुशेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. उपाहारापूर्वी वॉर्नरला शार्दुल ठाकूरने यष्टिरक्षक भरतच्या हाती झेलबाद केले. तो 60 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने 43 धावा करून बाद झाला. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावून 73 धावा केल्या होत्या.
उपाहारानंतर मोहम्मद शमीने मार्नस लबुशेनला क्लीन बोल्ड केले. तो 62 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 26 धावा करून बाद झाला. 24.1 षटकात लबुशेनची विकेट पडली. यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी जबरदस्त फलंदाजी करत दिवसभरात एकही विकेट पडू दिली नाही आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन गडी बाद 327 पर्यंत पोहचवली. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाचा संघ आणखी 142 धावा जोडून सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेड 163 धावांवर बाद झाला. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथने कसोटी कारकिर्दीतील 31वे शतक झळकावले. तो 121 धावा करून बाद झाला. कॅमेरून ग्रीन सहा, अॅलेक्स कॅरी 48, मिचेल स्टार्क पाच, पॅट कमिन्स नऊ आणि लियॉन नऊ धावा करून बाद झाले. भारताकडून सिराजने चार विकेट घेतल्या. शमी आणि शार्दुलला प्रत्येकी दोन बळी मिळाले. जडेजाने एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाच्या 469 धावांना प्रत्युत्तर देताना भारताची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. कर्णधार रोहित शर्मा 15, शुभमन गिल 13, चेतेश्वर पुजारा 14, विराट कोहली १४ धावा करून बाद झाले. 71 धावांपर्यंत भारताने चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर रवींद्र जडेजा आणि रहाणेने पाचव्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. ऑफस्पिनर नॅथन लायनने जडेजाचा अडसर दूर केला आणि स्लिपमध्ये त्याला झेलबाद केले. जड्डूने झुंझार 48 धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात पाच गडी गमावून 151 धावा केल्या.