पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin Wickets Century : दिल्ली कसोटीत अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 बळी पूर्ण केले. अश्विनने अॅलेक्स कॅरीची विकेट घेताच त्याचा कांगारूंविरुद्ध बळींचे शतक पूर्ण करणा-या गोलंदाजांच्या यादीत समावेश झाला.
खेळाच्या दुसऱ्या सत्रादरम्यान अश्विनने 47व्या षटकात तिसरी विकेट घेतली. आपल्या वैयक्तीक 17व्या षटकात त्याने ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरीला खाते उघडण्याची संधी दिली नाही. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अश्विन कॅरीचा पहिल्या स्लिपमध्ये विराट कोहलीने झेल पकडला. या विकेटनंतर भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला गेला. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासात अश्विनची ही शंभरवी विकेट ठरली. अशी कामगिरी करणारा तो जगातील 15 वा गोलंदाज ठरला आहे.
अश्विन हा अनिल कुंबळेनंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 100 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज बनला आहे. अश्विनने या मालिकेच्या इतिहासात 20 व्या सामन्यात 100 बळी पूर्ण केले. कुंबळेने 20 कसोटीत 30.32 च्या सरासरीने सर्वाधिक 111 विकेट घेतल्या आहेत. या यादीत भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत भज्जीने 18 सामन्यात 29.95 च्या सरासरीने 95 बळी घेतले. (r ashwin wickets century against australia)
इंग्लंडचे माजी क्रिकेटर सर इयान बोथम यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 36 कसोटींमध्ये सर्वाधिक 148 विकेट्स घेतल्या आहेत. त्या खालोखाल वेस्ट इंडिजच्या कोर्टनी वॉल्शचा क्रमांक लागतो. वॉल्शने 38 कसोटीत 135 कागारूं फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड (35 कसोटीत 131 बळी)चा क्रमांक लागतो. याशिवाय इतर 11 खेळाडूंनी अशी विक्रमी कामगिरी केली आहे. (r ashwin wickets century against australia)
अश्विनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावरच भारतीय संघाने उपाहारापूर्वी जबरदस्त पुनरागमन केले. त्याने अवघ्या तीन चेंडूंमध्ये मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून कांगारूंना दुहेरी झटके दिले.