चेन्नई, वृत्तसंस्था : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली भारत अ संघाने न्यूझीलंड अ (IND A vs NZ A) विरुद्धची अनधिकृत वन डे मालिका 3-0 ने जिंकली आहे. मंगळवारी झालेल्या तिसर्या वन डे सामन्यात भारत अ संघाने न्यूझीलंड अ संघावर तब्बल 106 धावांनी विजय मिळवला.
शार्दुल ठाकूर, संजू व तिलक वर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारत अ संघाने 284 धावांची मजल मारली. शार्दुलने अखेरच्या 5 षटकांत दमदार फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. त्यानंतर न्यूझीलंड अ संघाला 178 धावांत गुंडाळले. युवा गोलंदाज राज बावाने 11 धावांत 4 विकेट घेतल्या.
नाणेफेकीनंतर भारत अ संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अभिमन्यू इस्वरन व राहुल त्रिपाठी यांनी पहिल्या विकेटसाठी 55 धावा जोडल्या. राहुल 25 चेंडूंत 18 धावा करून माघारी परतला. त्यानंतर 10 धावांची भर घालून अभिमन्यू बाद झाला. त्याने 35 चेंडूंत 8 चौकारांसह 39 धावा केल्या. कर्णधार संजू व तिलक यांनी डाव सावरला. दोघांनी तिसर्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. तिलक 62 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 50 धावांवर बाद झाला.
श्रीकर भरत (9), राजा बावा (4), राहुल चहर (1) हे स्वस्तात बाद झाले. पण, संजूने 68 चेंडूंत 1 चौकार व 2 षटकार खेचून 54 धावांची खेळी केली.रिषी धवननेही उत्तम खेळ करताना 34 धावा केल्या. शार्दुलने अखेरच्या षटकांत वादळी खेळी करताना 32 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तो रन आऊट झाला. त्याने 33 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 51 धावा चोपल्या. भारत अ संघाचा डाव 49.3 षटकांत 284 धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंड अ संघाकडून जेकॉब डफी (2-45), मॅथ्यू फिशर (2- 61) व मिचेल रिपॉर (2-43) यांनी प्रत्येकी दोन विकेटस् घेतल्या. (IND A vs NZ A)
भारत अ संघाला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली. संघाची नाबाद अर्धशतकी सलामी झाली. परंतु त्यानंतर मात्र पडझड सुरू झाली. मधल्या फळीला राज अंगद बावाने कात्री लावली. सलामीवीर डेन क्लिवर याने एका बाजूने किल्ला लढवला. मात्र त्याला चांगली साथ लाभली नाही. शेवटी तो 83 धावांवर सहाव्या विकेटच्या रूपात बाद झाला. शेवटी त्यांचा संघ 178 धावांत गारद झाला.