पुणे : देशभरातच नाही तर संपूर्ण जगात धार्मिक पर्यटनात वाढ होत आहे. भारतामध्ये धार्मिक पर्यटनाला येणार्या परदेशी नागरिकांची संख्याही वाढत आहे. अध्यात्मिक आणि मन:शांती मिळवण्यासाठी पवित्र स्थळांना भेट देणार्यांची संख्या वाढत आहे. अयोध्यातील राम मंदिरानंतर यामध्ये अधिक वाढ झाली असल्याचे पाहण्यात आले आहे.
धार्मिक पर्यटनांमध्ये चार धाम, पंच केदार, बारा ज्योतिर्लिंग, एकावन्न शक्तिपीठ, वैष्णोदेवी, गंगा, यमुना, सरस्वती, प्रयाग, कुंभ, महाकुंभ, ब्रिज, द्वारका, कुरुक्षेत्र, ब्रिजची होळी, अयोध्या, चित्रकूट, रामेश्वरम, पुष्कर, तिरुपती, विरुपाक्ष यांसारख्या अनेक स्थळांचा समावेश होतो
सोशल मीडियातून धार्मिक स्थळांचा अधिक प्रचार
सध्या या धार्मिक स्थळांचे आकर्षण तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे. हे आकर्षण इतर अनेक गोष्टींप्रमाणे सोशल मीडियामुळे वाढते आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या धार्मिक स्थळांचा प्रचार अधिक होत असल्याचे दिसून आले आहे. अनेक जण या स्थळांना भेटी देऊन आल्यानंतर आपल्या मित्रपरिवाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची माहिती देतात. फोटो, व्हिडीओ, ब्लॉग, व्लॉग अशा विविध माध्यमांतून त्या त्या स्थळाची महती इतरांपर्यंतही पोहोचते.
धार्मिक स्थळांना भेटी देणार्या पर्यटक हे हंगामाप्रमाणे असतात. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षामध्ये धार्मिक स्थळांकडे पर्यटकांचा ओढा अधिक आहे. 12 ज्योतिर्लिंग बरोबरच अष्टविनायक, चार धाम, अमरनाथ, शिर्डी, शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर या स्थळांना अधिक मागणी आहे. काही पर्यटक काशी, हरिद्वार, ऋषिकेशबरोबरच उटी, मसुरी, डेहराडून, मदुराई या स्थळांचे धार्मिक स्थळांच्या पर्यटनात पॅकेज घेत आहेत. या धार्मिक स्थळांवर असलेल्या सुविधा आणि वाढलेली पर्यटकांची संख्या यामुळे सर्वच ठिकाणचे सोयी-सुविधा महाग झालेल्या आहेत. आगामी काळात अयोध्यातील राममंदिरामुळे आणखीन धार्मिक स्थळांच्या पर्यटनाला मागणी वाढणार आहे.
– नीलेश भन्साळी, संचालक, देवम टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स