पुणे; पुढारी वृत्तसेवा: न्यू आष्टी-अहमदनगर रेल्वे लाईनचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी झाले. यावेळी येथून सुटणाऱ्या पहिल्या डेमू पॅसेंजर ट्रेनला सुध्दा हिरवा झेंडा दाखविण्यात आला. अन पहिल्या टप्प्यातील 66 किलोमीटरची ब्रॉडगेज लाईन प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी उपस्थित होते.
66 किलोमीटर लांबीची नवीन आष्टी-अहमदनगर ब्रॉडगेज लाईन ही 261 किलोमीटर अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा एक भाग आहे. यात केंद्र शासन आणि राज्य सरकार यांचा 50-50 टक्के खर्चाचा वाटा आहे. त्याचे आज उदघाटन करण्यात आले. यामुळे स्थानिक व्यापार आणि उधोगाला उद्योगांना चालना मिळणार असून, त्यामुळे मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे
येथून सुटणारी डेमू ट्रेन अहमदनगरहून सकाळी 07 वाजून 45 वाजता सुटेल आणि न्यू आष्टीला सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात आष्टी येथून सकाळी 11 वाजता सुटेल आणि दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी अहमदनगर येथे पोहोचेल. ही गाडी रविवार वगळता दररोज धावणार आहे. कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायण डोहो येथे या गाडीला थांबा असेल.