Latest

भारताची अर्थव्यवस्था,आंतरराष्ट्रीय प्रतिमा जगासाठी आशेचे किरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नंदू लटके

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा -सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारताची वाढती अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमा यांच्याकडे जग आशेने पाहत आहे. आपल्या स्थैर्याबद्दलचे सुरुवातीचे सर्व संशय झुगारून, भारत पूर्ण ताकदीनिशी पुढे जात आहे आणि आपल्या विविधतेचा अभिमान बाळगत आहे. या यशाचे श्रेय संविधानाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ( दि. २६ ) केले.

पंतप्रधानांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयात साजऱ्या झालेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमास संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय संविधानाच्या विकास आणि विस्ताराच्या गेल्या ७ दशकांच्या प्रवासात विधिमंडळ, न्यायपालिका आणि कार्यकारिणीतील असंख्य व्यक्तींनी दिलेले योगदान पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या खास प्रसंगी संपूर्ण देशाच्या वतीने त्यांचे आभार मानले.

संविधानाची ही भावना भारताची भावना

संविधानातील उद्देशिकेतील 'आम्ही भारतीय लोक' या पहिल्या तीन शब्दांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, 'आम्ही भारतीय लोक' हे आवाहन, विश्वास आणि शपथ आहे. संविधानाची ही भावना भारताची भावना आहे, जी जगातील लोकशाहीची जननी आहे, असे ते म्हणाले. आधुनिक काळात, राज्यघटनेने राष्ट्राच्या सर्व सांस्कृतिक आणि नैतिक भावनांचा सामावून घेतले आहे, असे त्यांनी सांगितले.

समानता आणि सशक्तीकरण यासारखे विषय चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तरुणांमध्ये भारतीय राज्यघटनेबद्दल जागरुकता वाढवण्याच्या गरजेवर भर देत पंतप्रधानांनी आपली राज्यघटना तयार करण्यात आली तो काळ आणि तेव्हा देशासमोर असलेल्या परिस्थितीची आठवण करून दिली. "त्यावेळी संविधान सभेच्या चर्चेत काय झाले, या सर्व विषयांची माहिती आपल्या तरुणांना असायला हवी ", याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की, यामुळे त्यांची राज्यघटनेबद्दलची रुची वाढेल, असे पंतप्रधान म्हणाले.

देशाच्या संविधान सभेत १५ महिला सदस्य होत्या आणि वंचित समाजातील दाक्षायणी वेलायुधन सारख्या महिलांनी संविधान सभेत स्थान मिळवले. दाक्षायणी वेलायुधन सारख्या महिलांच्या योगदानावर क्वचितच चर्चा होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला आणि वेलायुधन यांनी दलित आणि कामगारांशी संबंधित अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT