Latest

आई-बाबा जेव्हा ओझे होतात… तीन वर्षांत 102 वृद्धांची ‘भरोसा’कडे धाव

अमृता चौगुले

नगर : घडीभर तू थांब गड्या
ऐक त्याची धाप रं।
लई अवघड हाय गड्या
उमगाया बाप रं॥

या गाण्याप्रमाणे नगर जिल्ह्यात 102 जणांना बापाची हाक ऐकायला वेळ नाही. शेवटी त्या वृद्ध-आई वडिलांनी पोलिसांच्या भरोसा सेलकडे धाव घेतली आणि म्हातारपणी काठीचा आधार शोधला. गेल्या तीन वर्षांतील ही आकडेवारी विदारक मानली जात आहे.
लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा॥ या उक्तीप्रमाणे प्रत्येकाचे लहानपण साखरेसारखे गोड असते. तरुणपणामध्ये नोकरी, व्यवसायाच्या माध्यमातून खिशात पैसा खुळखुळतो. त्यामुळे आयुष्याला आकार येतो. सेवानिवृत्तीनंतर व वृद्धापकाळात लेका-सुनांच्या हाती संसार देऊन मोकळे होतो आणि अनेकांची तिथूनच परवड सुरू होते. सासू-सुनेचं जमत नाही. वृद्ध आई-वडील घरात नकोसे होतात. मग, त्यांना धुसफूस सुरू होते.

मानसिक व शारीरिक त्रास सुरू होतो. आयुष्यभर कमावलेली पुंजी लेकरांच्या हातात दिल्यानंतर वृद्ध आई-वडील हताश होतात. मग सुरू होते न्यायासाठीची लढाई. मुलगा, मुलगी सांभाळत नाही म्हणून अनेक तक्रारी जिल्हा पोलिस विभागाच्या भरोसा सेलकडे येतात. पोलिस मुलाला बोलावून त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतात. तरी तो ऐकत नसल्यास प्रांताधिकार्‍यांकडे पाठवतात. मग प्रांताधिकारी वडिलांना महिन्याला खर्चाची रक्कम देण्याचा आदेश करतात. काही प्रकरणांमध्ये थेट गुन्हा दाखल करण्यात येतो.

त्यांना मिळाली सुखाची ऊब
आई-वडिलांना समजून घ्या. त्यांचे थोडे दिवस राहिले आहेत. त्यांची माया परत मिळणार नाही. त्यांना फक्त चांगले जेवण आणि कपडे हवे आहेत. त्यांना नातवंडांचे आणि नातवंडांनाही आजी-आजोबांचे प्रेम हवे आहे. तरच येणारी पिढी संस्कारक्षम घडेल, असे सांगून पोलिसांनी 40 जणांची समजूत काढली. त्यामुळे त्या आजी-आजोबांना आज सुखाची ऊब मिळत आहे.

मुलांवर गुन्हा नको म्हणून…
मुले सांभाळत नसल्याने आणि त्रास देत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक मंदिरात, बागेमध्ये जाऊन बसतात. आपल्या मुलांची पोलिसात तक्रार नको म्हणून ते उपाशी राहतात. तरीही भरोसा सेलमध्ये येणार्‍या तक्रारी ग्रामीण आणि शहरी भागातीलही आहेत. एकूण तक्रारीपैकी 30 टक्के तक्रारी उच्चशिक्षित कुटुंबांतील आहेत.

अभागी बापाच्या तक्रारी

  • मुलगा-सून सांभाळीत नाही, त्रास देतात.
  • घर व जमीन नावावर करून दे म्हणतात.
  • प्रॉपर्टीच्या वादातून नेहमी धुसफूस होते.
  • एक मुलाला जाते म्हणून दुसरा त्रास देतो
  • सूनबाई वेळेवर जेवण देत नाही
  • पेन्शन देत नाही म्हणून भांडतात

आई-वडिलांचा सांभाळ करणे हे प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे. मुले सांभाळ करीत नसल्याने ज्येष्ठ नागरिक मंदिर, बगीचा अशा ठिकाणांचा आधार घेतात. मुलांच्या विरोधात तक्रार देण्यास घाबरतात. त्यामुळे आम्ही शोध मोहीम राबवित आहोत. मुले सांभाळ करीत नसतील तर, ज्येष्ठ नागरिक कायद्याचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यासाठी भरोसा सेलशी संपर्क साधावा.
                               – पल्लवी देशमुख,पोलिस उपनिरीक्षक, भरोसा सेल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT