किशोर बरकाले
पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक एकदाची जाहीर झाल्याने हवेली तालुक्यातील नव्या नेतृत्वाला 19 वर्षांनंतर प्रथमच संधी निर्माण झाली आहे. कधीकाळी अविभाजित काँग्रेसचे पूर्णपणे वर्चस्व असलेल्या या समितीवर बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्येच थेट लढत होणार आहे. भाजपची हवेली तालुक्यात ताकद वाढली असून, त्याची चुणूक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दिसून आली आहे. त्यामुळे या दोन पक्षांमध्ये प्रामुख्याने चुरस राहील, हे स्पष्ट झाले आहे. पूर्वीच्या हवेली बाजार समितीचे संचालक मंडळ हे 2003 साली बरखास्त करण्यात आले. त्या वेळच्या संचालक मंडळावर काँग्रेस पक्षासह ज्येष्ठ नेते शरद पवार, अनंतराव थोपटे आणि दिवंगत रामकृष्ण मोरे यांना मानणारा वर्ग मोठा होता.
आता गेल्या 19 वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असतानाही आणि पालकमंत्रिपदही त्यांच्याच नेत्यांकडे असतानाही या बाजार समितीच्या निवडणुकीकडे सातत्याने काणाडोळा करण्यात आल्याची उघड तक्रार हवेलीतील नेत्यांमधून सतत होत असते. काहीही करून हवेली तालुक्यातील नेतृत्व वाढू द्यायचे नाही, असा छुपा अजेंडा राबवूनच या ठिकाणच्या निवडणुका लांबविल्याबद्दलचा नाराजीचा सूरही ऐकिवात येतो.
पुणे जिल्ह्यात सर्वांत विस्तारलेला आणि पुणे शहराची आर्थिक नाडी असलेला तालुका म्हणून हवेली तालुक्याची वेगळी ओळख आहे. तत्कालीन संचालक मंडळातील बहुतांश माजी सभापती, उपसभापती, ज्येष्ठ संचालक आजही राजकारणात सक्रिय असले; तरी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत हवेली तालुक्यातील भाजपचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे विजयी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनेही जिल्हा बँकेवर एकहाती सत्ता मिळवली असली, तरी भाजपच्या कंद यांचा विजय राष्ट्रवादीच्या नेतृत्वास बोचणारा ठरला आहे. त्यातूनच हवेली तालुक्या तील बाजार समितीच्या निवडणुकीतील गणितेही आपोआपच जिल्हा बँकेतील कंद यांच्या विजयामुळे बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.
हवेली तालुक्यात थेऊर येथील यशंवत सहकारी साखर कारखाना आणि बाजार समिती ही दोनच महत्त्वाची सत्ताकेंद्रे राहिलेली आहेत. त्यातील यशवंत कारखाना 2011 नंतरच्या हंगामानंतर बंदच आहे. तर, बाजार समितीवर लोकनियुक्त संचालक मंडळ 2003 पासून अस्तित्वात नाही. त्यामुळे हवेली तालुक्यातील विशेषतः युवा नेतृत्वाला सहकार व पणन क्षेत्रात अधिक काम करण्याची संधीच मिळाली नाही किंबहुना हवेली तालुक्याची राजकीय कोंडी करण्यात आल्याची तक्रार नेहमी होताना दिसते.
राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा बँक आणि जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असतानाही जुन्या नेतृत्वांऐवजी नवतरुणांना संधी देण्यास प्राधान्य दिले आहे. हाच पॅटर्न या वेळी पुणे बाजार समितीच्या निवडणुकांमध्येही राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींच्या यादीतून काही माजी संचालक वगळले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, नवतरुणांना वाव दिला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भारतीय जनता पक्षाकडून प्रदीप कंद यांच्यासह या बाजार समितीचे माजी सभापती व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रोहिदास उंदरे यांच्याकडे निवडणुकीची धुरा राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, बाजार समितीच्या काही माजी संचालकांनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका ठेवल्याचे समजते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुणे बाजार समिती, महापालिका व अन्य निवडणुकांसाठी महत्त्वाची बैठक बोलाविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.