पुणे: पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर महामार्गावर कंटेनर आणि दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील दोन सख्ख्या बहिणींचा जागेवर मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शाळेत जात असताना घडली आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन येथे हा अपघात झाला. यामध्ये दोघींचाही चेंदामेंदा झाला व जागेवरच मृत्यू झाला.
गायत्री नंदकुमार शितोळे (वय १७) राजश्री नंदकुमार शितोळे (वय- १० दोघीही रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) अशी अपघातात मरण पावलेल्या दोघींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छकुली ही इयत्ता अकरावीला लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तर राजश्री ही कन्या शाळा लोणी काळभोरमध्ये इयत्ता सहावीत शिकत होती. या दोघींचेही वडील दुचाकीवरून मुलींना शाळेत सोडण्यासाठी निघाले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने दुचाकीला जोरात धडक दिली.
पाठीमागे बसलेल्या दोन्ही मुली व वडील खाली पडले. कंटेनर दोन्ही मुलीच्या अंगावरून गेल्या तर वडील वाचले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या मुली शेजारी हतबल होऊन वडील तसेच बसून होते. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान गेल्या महिन्यात कंटेनरच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर परिसरातील फुरसुंगी रोडवर घडली होती.
अचानक घडलेल्या घटनेने शितोळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अपघाताची भीषणता एवढी होती की, दोघी सख्ख्या बहिणींच्या
अंगावरून कंटेनर गेल्याने त्यांचा त्यात चेंदामेंदा झाला. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांची पथके त्याला पकडण्यासाठी रवाना झाली आहेत.