Latest

राजस्थानात भाजपमधील बंडाळी काँग्रेसच्या पथ्यावर?

दिनेश चोरगे

'मोदी तुमसे बैर नही, लेकीन वसुंधरा तेरी खैर नही,' असा नारा गतवेळच्या राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत घुमला होता. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काहीही वैर नसल्याचे सांगत वसुंधराराजे शिंदे यांना धडा शिकविण्याचा निर्धार राजस्थानच्या जनतेने केला होता आणि त्यानुसार काँग्रेसच्या पारड्यात लोकांनी भरभरून मतेही टाकली होती. गत पाच वर्षांची मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. हिंदू सणांवेळी धार्मिक मिरवणुकांवर विशिष्ट वर्गाकडून झालेले प्राणघातक हल्ले, सरकारकडून या वर्गाच्या लांगूलचालनाचा झालेला आरोप, कन्हैया हत्याकांड, वाढता भ्रष्टाचार आदी कारणांमुळे गेहलोत सरकार गाजले. सलग दुसर्‍यांदा विजय प्राप्त करण्यासाठी गेहलोत यांनी कंबर कसली आहे. मात्र, त्यांच्यासमोर भाजपचे मोठे आव्हान आहे.

राजस्थानच्या जनतेने कुठल्याही पक्षाला सलग दुसर्‍यांदा सरकार बनविण्याची संधी दिलेली नाही. हा इतिहास बदलण्याची अपूर्व संधी काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांच्यासमोर आहे. भाजपच्या विविध गटांदरम्यान उसळलेली बंडाळी एक प्रकारे काँग्रेसच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. भाजपला पुन्हा सरकार बनवायचे असेल, तर गट-तट विसरून एकसंध होणे आवश्यक ठरणार आहे. राजस्थानच्या निवडणुकीत भाजपने खासदारांची फौज उतरविलेली आहे. यावरूनच पक्षाने ही निवडणूक किती प्रतिष्ठेची केली आहे याची कल्पना येते. काँग्रेसमध्ये गटबाजी आहे असे नाही; पण या पक्षात गेहलोत आणि सचिन पायलट असे दोनच प्रमुख गट आहेत. दुसरीकडे, भाजपमध्ये असंख्य गट-तट कार्यरत आहेत. यातील प्रमुख गटांमध्ये वसुंधराराजे गट, गजेंद्रसिंह शेखावत गटांचा समावेश होतो. तिकीट वाटपात वसुंधराराजे गटाकडे दुर्लक्ष केले जात असल्याची वदंता आहे. या पार्श्वभूमीवर या गटाचे अनेक नेते अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. मागील काही काळात हा गट कमजोर झालेला असला तरी, भाजपची नुकसान करण्याची या गटाची क्षमता आहे, हे विसरता येत नाही. जयपूर क्षेत्रात विधानसभेच्या 19 जागा आहेत. येथील पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा भाजपने केली आहे.

तिकीट नाकारलेले काँग्रेसच्या मार्गावर

तिकीट कापण्यात आलेले काही नेते काँग्रेसच्या मार्गावर आहेत. तसे झाले तर भाजपसाठी तो मोठा धक्का ठरेल. राज्यातील कोटा विभाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, मागील काही काळात याठिकाणी काँग्रेसची ताकद वाढली आहे. कोटा विभाग पिंजून काढण्यासाठी आगामी काळात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाचे प्रदेश प्रभारी सुखजिंदरसिंह रंधावा, मुख्यमंत्री गेहलोत तसेच प्रदेशाध्यक्ष गोविंद डोटासरा हे दौरे करणार आहेत. गत विधानसभा निवडणुकीचा विचार केला, तर 12 क्षेत्रांत चारमधील 3 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. कोटामधील 6 पैकी 3, तर बुंदी जिल्ह्यातील 3 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता.

गेहलोत-पायलटांतील स्थिती तिकीट वाटपानंतर कळेल

कर्नाटक विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार गटाने आपले मतभेद बासनात गुंडाळून पक्षाचा प्रचार केला होता. याचे चांगले फलित पक्षाला मिळालेसुद्धा होते. अशाचप्रकारे राजस्थानमध्ये निवडणुकीच्या तोंडावर गेहलोत आणि सचिन पायलट गटाने आपापल्या तलवारी म्यान करून सारे काही आलबेल असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न चालविला आहे. प्रत्यक्षात तिकीट वाटपानंतर खरी स्थिती काय राहील, याचा उलघडा होणार आहे. थोडक्यात, गटबाजीच्या मुद्द्यावर राजस्थानच्या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहील, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT