पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील दोन महिन्यांपासून अधिक काळ हिंसाचारात होरपळणार्या मणिपूर राज्यात संतापजनक आणि मानवतेला अत्यंत लाजिरवाणी करणारी घटना समोर आली आहे. राज्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचे दिसते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. विकृती प्रवृत्तीवर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. ( Manipur Horror )
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे लोक संतप्त झाले असून प्रशासनाकडून कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. दोन महिलांवर शेतात सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप एका आदिवासी संघटनेने केला आहे.
या प्रकरणी पोलिस अधीक्षक के मेघचंद्र सिंह यांनी सांगितले की, "व्हायरल होत असलेला व्हिडिओ ४ मे रोजीचा आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून या संदर्भात अज्ञात चोरट्यांविरुद्ध अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खून इत्यादींचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत."
या प्रकरणातील एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. खुयरुम हेरदास असे आरोपीचे नाव आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तो हिरवा शर्ट घातलेला दिसत आहे. व्हिडिओवरून त्याची ओळख पटली आहे.पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत कांगपोकपी जिल्ह्यातील घटनेची तारीख 4 मे असल्याचे नमूद केले आहे. तथापि, 21 जून रोजी थौबल जिल्ह्यात एफआयआर दाखल करण्यात आला. अज्ञात लोकांविरुद्ध अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मणिपूरमधील घटनेवर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, मणिपूरमध्ये भारताच्या संकल्पनेवर हल्ला होत आहे, विरोधी पक्षांची आघाडी 'इंडिया' याविरोधात आवाज उठवेल. आम्ही मणिपूरच्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत. शांतता हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे. मणिपूरमधील हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मौन सोडणार का, असा सवालही त्यांनी केला आहे.
या घटनेची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. हा व्हिडिओ ट्विटर आणि इतर सोशल मीडिया शेअर करू नका, असे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचेही स्पष्ट केले आहे. दरम्यान, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी या घटनेवर टीका करत हा मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे म्हटले आहे.
व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विटरवर या घटनेला "निंदनीय आणि पूर्णपणे अमानवीय" म्हटले आहे. स्मृती इराणी यांनी असेही सांगितले की त्यांनी मुख्यमंत्री बिरेन सिंग यांना डायल केले ज्यांनी त्यांना आश्वासन दिले की, "दोषींना न्याय मिळवून देण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही".