लंडन; वृत्तसंस्था : शाळकरी विद्यार्थ्यांचे वर्तन सुधारण्यासाठी आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वर्गांत मोबाईल फोन वापरावर बंदी घालण्याचा निर्णय ब्रिटन सरकारने घेतला आहे. ही मोबाईल बंदी ब्रिटनमधील सर्व शाळांसाठी अनिवार्य राहाणार असून उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे.
ब्रिटनच्या शिक्षणमंत्री गिलीयन किगन यांनी याबाबत सर्व शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात असल्याचे सांगितले. शाळा या मुलांच्या शिक्षणासाठीच आहेत, त्यामुळे वर्गात मोबाईलचा वापर विनाकारण लक्ष विचलित करणारा प्रकार आहे. त्याने संबंधित विद्यार्थी व सारा वर्गच प्रभावित होतो. त्यामुळे मुलांच्या वर्तनातही फरक पडतो तसेच त्यांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही. हे टाळण्यासाठी पावले उचलणे गरजेचे असल्याने ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
ही आहेत मार्गदर्शक तत्त्वे
– सर्व शाळांमध्ये सर्व वर्गांमध्ये मोबाईल वापरास बंदी.
– मधल्या सुट्टीत आणि खेळाच्या वेळीही मोबाईल नको.
– मुलांनी शाळेत मोबाईल आणूच नयेत किंवा आणल्यास शाळेत जमा करावेत.
– नियमांचे उललंघन केल्यास वर्गात बसण्यास तात्पुरती बंदी अथवा मोबाईल जप्त.
– प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी यानुसार शाळेचे मोबाईल धोरण तयार करावे.
मोबाईलचे मुलांवर होणारे दुष्परिणाम
शाळकरी वयातच मोबाईलचा वापर विद्यार्थी करीत असल्याने त्याचे दुष्परिणाम बघावयास मिळत आहेत. द़ृष्टिदोष, लक्ष केंद्रित करता न येणे, अस्वस्थता, एकलकोंडेपणा, अभ्यासात अधोगती, निद्रानाश, गैरकृत्याकडे ओढा, सायबर बुलिंग आदी प्रकार लहान मुलांच्या बाबतीत पाहावयास मिळतात.