Latest

महत्त्वाची बातमी ! पुण्यात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहराचा पाणीपुरवठा पुढील आठवड्यापासून दर गुरुवारी (दि. 18 मे) बंद राहणार आहे. हवामान विभागाने यंदा उशिरा आणि कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने आठवड्यातून एकदा पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. आयुक्त विक्रम कुमार व पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुध्द पावसकर यांनी या निर्णयाची माहिती दिली. पाणीकपातीमुळे साधारणपणे 0.25 टीएमसी पाणी हे तीन महिन्यांत वाचण्यास मदत होईल, असा दावा त्यांनी केला. यंदा अल निनोच्या समुद्री प्रभावामुळे कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी साठ्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर गतमहिन्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पाणीकपातीवर चर्चा झाली होती. शहरात एक दिवस पाणी बंद ठेवल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होतो, अशी तक्रार लोकप्रतिनिधींनी या वेळी केली होती. त्यावर प्रशासनाने जलवाहिन्यात 'एअर ब्लॉक' मुळे हा पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे निदर्शनास आणले होते. ही अडचण दूर करण्यासाठी 'एअर वॉल्व्ह' बसवून पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला पालकमंत्र्यांनी दिल्या होत्या.

त्यानुसार महापालिकेने एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतर दुसर्‍या दिवशी ज्या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होतो अशा वीस ठिकाणी महापालिकेने 'एअर वॉल्व्ह' बसविले आहेत. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मदत होईल. तसेच या भागात पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल यादृष्टीने यंत्रणा उभी केल्याची माहिती पावसकर यांनी दिली. तसेच पालकमंत्र्यांना माहिती देऊन हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

धरण साखळीत 9.70 टीएमसी पाणीसाठा
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या चारही धरणांमध्ये सद्य:स्थितीत एकूण 9.70 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो 9.20 टीएमसी इतका होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा अधिक आहे. मात्र, अल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने यंदा 15 जुलैऐवजी 31 ऑगस्टपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन केले आहे. त्यानुसारही आठवड्यातून एकदा पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जूनमध्ये पाऊस लांबला तर पाणीकपात आणखी वाढू शकते, असे आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT