कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : व्यक्तिमत्त्वाशी घनिष्ठ संबंध असतानाही सुमारे ८० टक्के नागरिक मौखिक आरोग्याच्या बाबतीत निष्काळजी आहेत. त्यामुळे तोंडाचे व दातांचे आजार वाढत आहेत. अलीकडे मुख कर्करोगात वाढ होताना दिसत आहे. १२५ व्यक्तींमागे दोन कॅन्सरग्रस्त आढळत असल्याचे कॅन्सरतज्ज्ञांनी सांगितले.
चेहरा व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे. आपण सुहास्य वदनाने समोरच्या व्यक्तीशी संवाद साधतो. अलीकडे नागरिकांचे बाह्य आरोग्य टापटीप ठेवण्यावर भर आहे. पण अंतरंगाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मौखिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. हिरड्यांचे आजार, मुख कर्करोग प्रामुख्याने दिसून येत आहे. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक असून, त्या खालोखाल मुखाचा कॅन्सर वाढला आहे. मौखिक आरोग्याचा परिणाम शरीराच्या इतर अवयवांवरदेखील होत असतो.
मौखिक आरोग्य बिडी, सिगारेट, पान, गुटखा, तंबाखूच्या व्यसनामुळेच बिघडते. वेळीच व्यसन सावरले नाही तर मौखिक आरोग्य बिघडून अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. २२ ते ४० वयोगटात हे प्रमाण अधिक आहे.
रात्री झोपण्यापूर्वी गोड पदार्थ खाणे टाळावेत, दाढदुखी व दात दुखीकडे दुर्लक्ष नको. हिरड्यातून रक्त, पू येत असल्यास ब्रश करणे टाळावे. तंबाखू, मिश्री लावणे बंद करावी.
तोंडाच्या स्वच्छतेसाठी दात व जीभ स्वच्छ असणे गरजेची असते. जेवणानंतर दातांमध्ये अन्नाचे कण राहून तोंडाला दुर्गंधी येते. दातावर चिकटपणा जाणवतो. लहान मुले गोड पदार्थांचे अधिक सेवन करतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या दात व तोंडाची स्वच्छता ठेवली पाहिजे. पदार्थांच्या सेवनानंतर खळखळून चूळ भरा. दिवसातून दोनवेळा ब—श करा. जीभ स्वच्छ करा. 6 महिन्यांनी डॉक्टरांकडून दात स्वच्छ करून घ्या.