नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नवीन मंत्र्यांनी शपथ घेऊन तब्बल १२ दिवस झाले, पण अद्याप खातेवाटप झालेले नाही. मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, यामध्ये बिनखात्याचे मंत्री बसले होते. अजूनही मंत्रिपदाच्या काही जागा रिक्त आहेत, त्या रिकाम्या जागा सरकारने भरल्या पाहिजे, असे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले, येत्या सोमवारपासून, १७ जुलैपासून महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. मंत्रीच नाही तर अधिवेशनाला काही अर्थ उरणार नाही. काही मंत्र्यांकडे पाच – सहा जिल्ह्यांची पालकमंत्री म्हणून जबाबदारी आहे. सरकारमध्ये आलेल्याना आमदारांना मंत्रिपदाची प्रतीक्षा आहे.भाजपचेही आमदार प्रतीक्षेत आहेत. अलिकडे आलेल्याना मंत्रिपद मिळाले म्हणत त्यांच्यासोबत गेलेले आमदारच त्यांच्यावर ताशेरे ओढत आहेत. खरं तर अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांतील अस्वस्थता वाढली आहे. फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष नाही, लोक नाराज आहेत. सद्यःस्थितीत अनेक आमदार शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. बच्चू कडू प्रचंड नाराज आहेत, त्यांनी तर अल्टिमेटमही दिला.
६० हजार हजार कोटी रुपयांचे करार विदर्भात झाल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल नागपुरात सांगितले. सविस्तर माहिती त्यांनी द्यावी, केवळ बोलू नये. अनेक प्रकल्प मिहानमध्ये येणार होते, मात्र आले नाहीत. शासनाच्या दुर्लक्षामुळे हे प्रकल्प गेल्याचा आरोप देशमुख यांनी केला.