Latest

Shubman Gill Replacement : बीसीसीआयने शोधला शुभमन गिलचा पर्याय? ऋतुराज किंवा यशस्वीची होणार टीम इंडियात एन्ट्री?

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shubman Gill Replacement : अप्रतिम फॉर्मात असलेला शुभमन गिल अचानक आजारी पडणे हा भारतीय संघासाठी एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही. त्याला डेंग्यूची लागण झाली होती आणि त्यामुळे तो वनडे वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना खेळू शकला नव्हता. त्यानंतर बातमी आली की प्लेटलेट काउंट एक लाखाच्या खाली आल्यावर गिलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, आज (दि. 10) त्याला डिस्चार्ज मिळाल्याची बातमी समोर आली. भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे, पण विश्वचषकाच्या आगामी सामन्यांमध्ये त्याचे खेळणे कठीण आहे. कारण डेंग्यूमधून बरे होऊन तंदुरुस्ती मिळवण्यासाठी किमान दोन आठवडे लागतात. परिणामी अफगाणिस्तानपाठोपाठ आता तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

..तर सरप्राईज एन्ट्री

गिल आजारी असल्याचा भारतीय संघाला फटका बसला आहे. 15 जणांचा संघ असला तरी तंदुरुस्त असणारे खेळाडू 14 आहेत. त्यामुळे गिलशिवाय 14 खेळाडूंसह संघाने पुढे जावे की, एखाद्या नव्या खेळाडूचा समावेश करावा असा प्रश्न भारतीय संघापुढे आहे. पण जर गिल ऐवजी पर्यायी खेळाडूचा निर्णय घेण्यात आलाच तर टीम इंडियामध्ये कोणाची एन्ट्री होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार बीसीसीआयची वरिष्ठ निवड समिती एक बैठक घेणार आहे. ज्यात शुभमन गिलचे अफगाणिस्तान आणि उर्वरित विश्वचषक सामन्यांतील खेळण्यावर विचार केला जाईल. अशातच जर भारतीय संघाने गिलच्या बदलीची मागणी केल्यास ही समिती ऋतुराज गायकवाड किंवा यशस्वी जैस्वाल यांच्यापैकी एकाची निवड करू शकते, अशी चर्चा रंगली आहे.

'या' तीन फलंदाजांचा दावा

चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आशियाई क्रीडा स्पर्धेत सलामीची जोडी म्हणून खेळले. दोघांनी प्रभावी फलंदाजी केली. या दोघांशिवाय संजू सॅमसनही शर्यतीत आहे, मात्र ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठीही ऋतुराज टीम इंडियाचा भाग होता. त्यातील एका सामन्यात ऋतुराजने अर्धशतक फटकावून 71 धावांची खेळी सुरेख खेळी साकारली होती.

गिल आजारी असणे भारतासाठी धक्का

डेंग्यूमुळे शुभमन गिल चेन्नईतच थांबला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान तो स्टेडियममध्येही आला नाही. आता भारतीय संघ अफगाणिस्तान विरुद्ध पुढचा सामना खेळण्यासाठी दिल्लीला पोहोचला आहे. मात्र, गिल अजूनही चेन्नईत आहेत. भारतासाठी हा मोठा धक्का आहे, कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी सलामी दिली होती. पण या दोघांनाही खाते उघडता आले नाही. त्यामुळे अशा बिकट परिस्थितीत गिलची कमतरता भासली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT