पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष तीव्र झालेला असतानाच इस्रायलकडून गंभीर चूक झाली आहे. इस्रायलच्या हल्ल्यात गाझात हमासने बंधक बनवलेल्या तीन इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. इस्रायल सर्व बंधकांना पुन्हा देशात आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही नेत्यान्याहू यांनी म्हटले आहे. ही घटना गाझातील शिजैयाह या शहरात घडली आहे. israel hamas war
इस्रायल डिफेन्स फोर्सने (IDF) याबद्दल अधिकृतरीत्या माहिती दिली आहे. IDFने म्हटले आहे की, "इस्रायलचे तीन बंधक घटनास्थळी होते. आमच्या सैनिकांनी चुकून त्यांना शत्रू समजून गोळीबार केला, आणि त्यात या तिघांचा मृत्यू झाला." मृतांपैकी दोघांची नावे, योताम हैम आणि समेर तलल्का अशी आहे. तरी तिसऱ्या मृताची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. इस्रायली सैनिकांनी तिघांचे मृतदेह देशात परत आणले आहेत, अशी बातमी द वायर या वेबसाईटने दिली आहे.
ही घटना समजल्यानंतर तेल अविवमध्ये तीव्र पडसाद उमटले. या घटनेबद्दल नागरिकांनी रास्ता रोको तसेच निदर्शने केली. हमासने बंधक बनवलेल्या सर्व इस्रायली नागरिकांना तातडीने परत आणले जावे, अशी मागणी इस्रायली नागरिक करत आहेत. बऱ्याच निदर्शकांनी नेत्यान्याहू यांचा तीव्र निषेध केला आहे. बंधकांना मुक्त करण्यात इस्रायली सरकार अपयशी ठरत असल्याची टीका निदर्शक करत आहेत. ७ ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर हल्ला करून २४० लोकांना बंधक बनवले. त्यानंतरच्या युद्धविराममध्ये ११० नागरिकांची मुक्तता करण्यात आली.
हेही वाचा