पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC ODI World Cup : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या 7 व्या सामन्यात मंगळवारी इंग्लंडने बांगलादेशचा 137 धावांनी दारुण पराभव करत विजयाचे खाते उघडले. इंग्लंडला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. दुसरीकडे बांगलादेश संघाला या विश्वचषकात पहिला पराभव पत्करावा लागला आहे. बांगलादेशने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला होता. या विजयासह इंग्लंडचे दोन गुण झाले असून हा संघ आता गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आला आहे. त्याचवेळी मोठ्या पराभवामुळे बांगलादेशची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्याचेही दोन सामन्यांत दोन गुण आहेत.
इंग्लंडने बांगलादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करत 9 विकेट्स गामावून 364 धावा केल्या. विश्वचषकातील त्याची ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड मलान यांच्यात शानदार शतकी भागीदारी झाली. मलानने 140 धावांची शतकी खेळी खेळली तर जो रूटनेही 82 धावा केल्या. बांगलादेशसाठी सर्व गोलंदाज महागडे ठरले. मेहदी हसनला 4 विकेट घेण्यात यश आले. इंग्लंडच्या फलंदाजांसमोर सर्व गोलंदाज हतबल दिसत होते.
बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली आणि 121 धावांपर्यंत त्यांचे 5 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. लिटन दासने 76 धावांची खेळी खेळली, ज्यामुळे संघाला सर्वबाद 227 धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडकडून रीस टोपलेने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर ख्रिस वोक्सला 2 बळी घेण्यात यश आले. वेगवान गोलंदाजांच्या स्विंग होणाऱ्या चेंडूंना बांगलादेशच्या फलंदाजांकडे उत्तर नव्हते.
मलानने आपल्या शतकी खेळीत (107 चेंडूत 140 धावा) 16 चौकार आणि 5 षटकार ठोकले. त्याचा स्ट्राइक रेट 130.84 होता. त्याने अवघ्या 91 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मालनचे हे विश्वचषकातील पहिले शतक आहे. या दरम्यान, तो एका कॅलेंडर वर्षात इंग्लंडसाठी सर्वाधिक शतके करणारा संयुक्त तिसरा खेळाडू बनला आहे. बेअरस्टो आणि डेव्हिड गोवर (एका वर्षात 4-4 शतके) यांनी यापूर्वी अशी कामगिरी केली आहे. मलानच्या 2023 मध्ये 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये 745 धावा झाल्या आहेत.
बांगलादेशविरुद्ध जो रूटने शानदार खेळी केली. मात्र, त्याचे शतक 18 धावांनी हुकले. त्याने 68 चेंडूत 82 धावा तडकावल्या. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 38 वे अर्धशतक ठरले. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, तो वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा (917) करणारा फलंदाज बनला. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार लगावला.
बांगलादेशसाठी सलामीवीर लिटन दासने कठीण काळात चमकदार फलंदाजी केली. त्याने 66 चेंडूत 115.15 च्या स्ट्राईक रेटने 76 धावा केल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. लिटनचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील 11 वे अर्धशतक ठरले. 49 च्या स्कोअरवर बांगलादेशचे 4 खेळाडू बाद झाले होते. त्यानंतर लिटनने मुशफिकुर रहीमसह डावाची धुरा सांभाळली. दोघांनी 5व्या विकेटसाठी 72 धावा जोडल्या.
बांगलादेशसाठी अष्टपैलू महेदी हसनने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने 8 षटकात 4 बळी घेतले. मात्र, या दरम्यान तो चांगलाच महागात पडला. त्याने 8.90 च्या इकॉनॉमीमध्ये 71 धावा दिल्या. यापूर्वी 45 धावांमध्ये 3 विकेट ही त्याची वनडेतील सर्वोत्तम गोलंदाजीची आकडेवारी होती. महेदीने हॅरी ब्रूक (20), सॅम करन (11), आदिल रशीद (11) आणि बेअरस्टो यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.