पुढारी ऑनलाईन डेस्क : वन-डे ( एकदिवसीय) विश्वचषक स्पर्धेत आज ( दि. 11 ) भारताची लढत अफगाणिस्तानविरुद्ध होत आहे. अफगाणिस्तान नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( IND Vs AFG ODI WC ) शाहिदी ( ८८ चेंडूत ८०), उमरजाई ( ६९ चेंडूत ६२) यांच्या दमदार फलंदाजीच्या जाेरावर अफगाणिस्तानने ५० ओव्हरमध्ये ८ गडी गमावत २७२ धावा केल्या आहेत.
अफगाणिस्तानने आपल्या डावाची सावध सुरुवात केली. सहा ओव्हरमध्ये विनाबाद २८ धावा केल्या. सातव्या ओव्हरमध्ये सलामीवीर इब्राहिम झद्रानला वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराहने यष्टीरक्षक केएल राहुल करवी झेलबाद केले. त्याने २८ बॉलमध्ये २२ धावा केल्या. यामध्ये चार चाैकारांचा समावेश हाेता.सामन्याच्या १३ व्या ओव्हरमध्ये अफगाणिस्तानला दुसरा धक्का बसला. भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याने गुरबाजला शार्दुल ठाकूर करवी झेलबाद केले. गुरबाजने आपल्या खेळीत २८ बॉलमध्ये २१ धावा केल्या.
हशमुतुल्लाह शाहिदीने केलेल्या ८८ चेंडूत ८० धावांच्या खेळीने अफगाणिस्तानचा आत्मविश्वास वाढला. त्याला उमरजाईची भक्कम साथ लाभली. त्याने ६९ चेंडूत ६२ केल्या. मात्र या दाेघांशिवाय अन्य फलंदाजांनी निराशा केली. केवळ इब्राहिम झद्रान हाच दाेन अंकी धावा करु शकला. बुमराहने चार, पंड्याने २, शार्दुल आणि कुलदीपने प्रत्येकी एक बळी घेतला. तर मोहम्मद सिराज सामन्यात महागडा खेळाडू ठरला त्याने ९ ओव्हरमध्ये सर्वाधिक ७६ धावा दिल्या. त्याला सामन्यात विकेट खातेही उघडता आले नाही.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान संघ : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.
अफगाणिस्तानला पहिल्या लढतीत बांगला देशकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता टीम इंडिया विजयाची लय कायम ठेवण्यास उत्सुक असेल, तर अफगाणिस्तानचा संघ भारताविरुद्धच्या पहिल्या विजयासाठी प्रयत्न करेल. दिल्लीच्या मैदानावर या वर्ल्डकपमधील ही दुसरी लढत आहे. याआधी श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिली लढत झाली होती. त्या सामन्यात विक्रमी धावसंख्या उभारली गेली होती. दोन्ही संघांनी मिळून 754 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 428 धावांचा डोंगर उभा केला. उत्तरादाखल श्रीलंकेने 326 धावा केल्या होत्या. (IND Vs AFG ODI WC )
पीच रिपोर्ट
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. सीमारेषा जवळ असल्याने फलंदाजांना अधिक फायदा मिळतो. याशिवाय ही खेळपट्टी संथ असते. ज्यामुळे फिरकीपटूंना अधिक मदत मिळते. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 230, तर दुसर्या डावातील सरासरी 207 इतकी आहे. या मैदानावर झालेल्या 29 वन-डे मॅचमध्ये 14 वेळा प्रथम फलंदाजी करणार्या संघाने, तर 14 वेळा दुसर्यांदा फलंदाजी करणार्या संघाने विजय मिळवला आहे. (IND Vs AFG ODI WC )