पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Rules Changed : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी क्रिकेटच्या नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. हे बदल 1 ऑक्टोबरपासून लागू होतील. ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी हे नवे नियम लागू असतील. या नियमांमध्ये प्रामुख्याने नॉन स्ट्रायकरला धावबाद करण्याच्या मंकडींग पद्धातीचाही समावेश आहे.
आता नवीन नियमानुसार फलंदाज आउट झाल्यानंतर त्याच्या जागी नवीनच खेळाडू स्ट्राइक घेईल. यापूर्वी फलंदाज झेलबाद झाल्यास खेळणारा खेळाडू हा बॉलिंग एंडवर धावत जात असे. त्यामुळे नवीन फलंदाज हा नॉन स्ट्राइकर एंडलाच थांबत असे. मात्र आता फलंदाज बाद झाला तर नवीन फलंदाजच स्ट्राइक घेणार आहे. या नियमाचा वापर हा इंग्लंड ॲण्ड वेल्स क्रिकेट बोर्डने (ईसीबी) हंड्रेड लीगमध्ये या नियमाचा अंमलबाजावणी केली आहे. आता केवळ षटक संपले असेल तरच नवा फलंदाज हा नॉन स्ट्राइकरला जाईल.
मंकडिंग (नॉन स्ट्राइकवर असलेल्या फलंदाजाने गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वीच क्रिज सोडल तर गोलंदा संबंधित फलंदाजाला धावचीत करतो) पद्धतीने फलंदाजाला गोलंदाज बाद करु शकतो, मात्र यामध्ये तो अपयशी ठरल्यास हा चेंडू 'डेड बॉल ' मानला जाईल, असे नवीन नियमात स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी क्रिकेटमधील नियम ४१ नुसार अशा प्रकारे फलंदाजास बाद करणे खिळाडूवृती विरोधात असल्याचे मानले जात होते. मात्र आता नियम ३८ नुसार अशा प्रकारे बाद करणे धावचीत मानले जाणार आहे.
१९४७ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील एका सामन्यात भारताच्या विनू मंकड यांनी गोलंदाजीपूर्वी क्रीज सोडून पुढे गेलेल्या बिल ब्राऊनला रन आऊट केले. तेव्हापासून अशा पद्धतीने फलंदाजाला आऊट केल्यास मंकडिंग असे संबोधले गेले. यावेळी यावर ऑस्ट्रेलियात मोठी टीकाही झाली होती. अशा प्रकारे फलंदाजास आऊट करणे खिळाडूवृती नाही, असे म्हटलं गेले. मात्र आता हा नियम कायम ठेवण्यात आला आहे.
आता यापुढे क्षेत्ररक्षण करताना खेळाडूंना काळजी घ्यावी लागणार आहे. कारण संबंधित खेळाडूने चुकीच्या हालचाली केल्यास फलंदाजी करणार्या संघाला ५ अतिरिक्त धावा दिल्या जाणार आहेत. यापूर्वीच्या नियमानुसार क्षेत्ररक्षण करणार्या खेळाडूंनी काही चुकीच्या हालचाली केल्यास डेड बॉल दिले जात होते. तसेच हा चेंडू फलंदाजाने फटकावल्यास त्यावरील धावा ग्राह्य मानल्या जात नव्हत्या.
क्रिकेट मैदानात सामना सुरु असताना अचानक क्रिकेट फॅन, पाळीव प्राणी किंवा एखाद्या वस्तुंमुळे खेळास अडथळा अल्यास पंच त्यावेळी टाकण्यात आलेला चेंडू हा डेड बॉल घोषित करु शकतात.
नवीन फलंदाजाला क्रिजवर पोहोचल्यानंतर निर्धारित वेळेत फलंदाजीसाठी सज्ज राहावे लागेल. त्याला एकदिवसीय आणि कसोटीमध्ये दोन मिनिटे तर टी-20 मध्ये 90 सेकंद मिळतील.
फलंदाजाला पुढे येऊन तसेच ऑफ साईडला बाहेर जाऊन शॉट खेळण्याचा फायदा होईल. मात्र, शॉट खेळताना फलंदाजाच्या बॅटचा काही भाग किंवा फलंदाज स्वत: खेळपट्टीच्या आत असणे आवश्यक आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास, चेंडू 'डेड' म्हणून घोषित केला जाईल. तर कोणताही असा चेंडू ज्यामुळे फलंदाज खेळपट्टी सोडेल त्याला नो बॉल म्हणून घोषित केले जाईल.