पुढारी ऑनलाईन डेस्क : Mohammed Siraj : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने खळबळ उडवून दिली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत सिराजला त्याच्या स्फोटक कामगिरीचा बंपर फायदा झाला असून आयसीसी वन-डे एकदिवसीय क्रमवारीत त्याने अव्वल स्थानी झेप घेतली आहे. त्याने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड यांना मागे टाकले आहे.
सिराजने 15 जानेवारी 2019 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड सामन्यात वन-डे पदार्पण केले. या सामन्यात सिराजला विकेट मिळाली नाही, तसेच पुढील तीन वर्षे एकही वन-डे सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. सिराजने 6 फेब्रुवारी 2022 रोजी तीन वर्षांनंतर कारकिर्दीतील दुसरा एकदिवसीय सामना खेळला.
यानंतर सिराजने चमकदार कामगिरी करत मागे वळून पाहिले नाही. सिराजने टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण 21 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने 20.73 च्या सरासरीने 38 विकेट्स घेतल्या आहेत. अलीकडेच सिराजने न्यूझीलंडविरुद्ध तीनपैकी दोन एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्याने 5 विकेट घेतल्या. याआधी त्याने श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 9 विकेट घेत दहशत निर्माण केली होती.