T20 सामन्यांसाठी ICC चे नवे नियम जाहीर, आता ‘या’ चुकीला माफी नाही! 
Latest

T20 सामन्यांसाठी ICC चे नवे नियम जाहीर, आता ‘या’ चुकीला माफी नाही!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) टी २० (T20) आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या नियमांमध्ये दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. स्लो ओव्हर रेटसाठी दंडात्मक कारवाई आणि ड्रिंक ब्रेक बाबतचे हे नवे नियम लागू करण्यात आल्याची माहिती आयसीसीने दिली आहे. या महिन्यापासूनच संघांना टी-२० सामन्यांमध्ये स्लो ओव्हर रेटसाठी मोठी शिक्षा होणार आहे. जर एखादा संघ निर्धारित वेळेत पूर्ण षटके पूर्ण करू शकला नाही, तर त्या संघातील ३० यार्ड सर्कलच्या बाहेरील एक क्षेत्ररक्षक कमी केला जाईल.

आयसीसी निवेदनानुसार, स्लो ओव्हर रेटचे नियम आधीच निश्चित केले आहेत. पण या अंतर्गत एक नवा नियम लागू करण्यात आला आहे. टी-२० सामन्यात क्षेत्ररक्षण करणारा संघ निर्धारित वेळेत शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू टाकण्याची तयारी करत असेल, आणि जर त्या संघाला तसे करता आले नाही, तर त्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. सध्याचा नियम असा आहे की, पॉवर प्ले वगळता उर्वरित वेळेत संघ ५ क्षेत्ररक्षकांना बाहेर ठेवू शकतात. जर एखाद्या संघाने गोलंदाजी करण्यास उशीर केला. तर त्यांना शेवटच्या क्षणी त्यांच्यापैकी एक क्षेत्ररक्षक जबरदस्तीने आत ठेवावा लागेल.

याआधी स्लो ओव्हर रेटसाठी संघांवर बंदी किंवा दंड आकारण्यात आला होता. मात्र, दंडाचा फटका खेळाडूंना बसत नसल्याने ते पुन्हा पुन्हा त्याच चुका करत असल्याने त्यावर बरीच टीकाही झाली. नवा नियम इंग्लंडच्या १०० चेंडूंच्या द हंड्रेड स्पर्धेने प्रभावित आहे आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

आयसीसीने अधिकृत निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'नियमांमधील या बदलाची शिफारस आयसीसी क्रिकेट समितीने केली होती, ज्याचे काम प्रत्येक फॉरमॅटमध्ये खेळाचा दर्जा सुधारणे हे आहे. ईसीबीने द हंड्रेडसाठी बनवलेल्या नियमांवर आधारित हे नवे नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागू केले गेले आहेत.

टी-२० क्रिकेटमध्ये पॉवरप्लेनंतर, संघ ३० यार्डच्या बाहेर पाच क्षेत्ररक्षक ठेवू शकतात. परंतु जर संघ निर्धारित वेळेत आपली षटके पूर्ण करू शकला नाही. तर तो ३० यार्डांच्या बाहेर फक्त चार क्षेत्ररक्षक ठेवण्यास सक्षम असेल. दुसरीकडे, इतर बदलांबद्दल बोलायचे झाले तर, आयसीसीने आता ऑप्शनल ड्रिंक्स ब्रेकचा नियम लागू केला आहे. हा ड्रिंक ब्रेक प्रत्येक डावाच्या १० षटकांनंतर घेतला जाऊ शकतो. यचा कालावधी अडीच मिनिटांचा असेल. १६ जानेवारी रोजी होणाऱ्या वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यातील टी-२० सामन्यापासून या नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती आयसीसीने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT