पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Cricket World Cup : विश्वचषक 2023 च्या 18 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाचा या स्पर्धेत सलग दुसरा विजय आहे, तर पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव आहे. बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना, डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 9 गडी गमावून 367 धावा केल्या. प्रत्युत्तरात अब्दुल्ला शफीक आणि इमाम उल हक यांच्या शतकी भागीदारीनंतरही पाकिस्तानने सामना गमावला. पाकिस्तानने 45.3 षटकात 305 धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानकडून इमाम उल हकने सर्वाधिक 70 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने चार, स्टॉइनिस-कमिन्सने दोन गडी बाद केले. तर हेजलवूड आणि स्टार्कला 1-1 बळी मिळाला.
368 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने चांगली सुरुवात केली आहे. इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफीक वेगाने धावा केल्या. या जोडीने शतकी भागिदारी रचली. 134 धावांवर पाकिस्तानची पहिली विकेट पडली. अब्दुल्ला शफीक 64 धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिसने त्याला ग्लेन मॅक्सवेलकरवी झेलबाद केले. त्यानंतर बाबर आझम क्रीजवर आला. त्याने इमामसह संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण संघाची धावसंख्या 154 असताना इमाम माघारी परतला. मार्कस स्टॉइनिसने ऑस्ट्रेलियाला दुसरे यश मिळवून दिले. मिचेल स्टार्कने त्याचा झेल पकडला. इमामने 70 धावा केल्या. आता पाकिस्तानला विजय मिळवून देण्याची जबाबदारी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीवर होती. पण 175 धावांवर त्यांना बाबर आझमच्या रुपात तिसरा धक्का बसला. अॅडम झाम्पाने त्याला पॅट कमिन्सकरवी झेलबाद केले. बाबरने 14 चेंडूत 18 धावा केल्या. यानंतर पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला. मोहम्मद रिझवानने सौद शकीलच्या साथीने पाकने कशाबशा 200 धावा ओलांडल्या. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. 232 धावांवर पाकिस्तानची चौथी विकेट पडली. पॅट कमिन्सने सौद शकीलला मार्कस स्टॉइनिसकडे झेल देण्यास भाग पाडले. शकीलने 31 चेंडूत 30 धावा केल्या. इफ्तिखार अहमदने येताच फटकेबाजी केली. आणि संघाची धावसंख्या अडीचशेच्या पुढे पोहचवली. पण धावसंख्या 269 असताना अॅडम झाम्पाने इफ्तिखार अहमदला पायचीत केले. इफ्तिखारने 20 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. 274 धावांच्या स्कोअरवर पाकिस्तानने सहावी विकेट गमावली. मोहम्मद रिझवान 40 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. अॅडम झाम्पाने त्याला पायचीत केले. याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा विजय जवळपास निश्चित झाला. 277 वर पाकिस्तानने सातवी विकेट गमावली. जोश हेझलवूडने मीरला मिचेल स्टार्ककरवी झेलबाद केले. मीरला खातेही उघडता आले नाही. पाकिस्तानने 287 धावांत आठ विकेट गमावल्या. मोहम्मद नवाज 16 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. अॅडम झाम्पाच्या गोलंदाजीवर त्याला विकेटकीपर इंग्लिशने यष्टीचीत केले. पाकिस्तानने 301 धावांवर नववी विकेट गमावली. हसन अली आठ चेंडूत आठ धावा करून बाद झाला. मिचेल स्टार्कने त्याला जोश इंग्लिसकरवी झेलबाद केले. शेवटी शाहीन आफ्रिदी बाद होताच पाकिस्तानने हा सामना गमावला आणि ऑस्ट्रेलियाने सलग दुस-या विजयावर शिक्कामोर्तब केला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 368 धावांचे लक्ष्य दिले. कांगारूंनी 50 षटकांत नऊ गडी गमावून 367 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी शतके झळकावली. डेव्हिड वॉर्नरने 163 आणि मिचेल मार्शने 121 धावा केल्या. या दोघांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला 25 धावांचा पल्ला गाठता आला नाही. मार्कस स्टॉइनिसने 21 धावा केल्या. जोश इंग्लिशने 13 धावांचे योगदान दिले. मार्नस लॅबुशेन आठ धावा करून बाद झाला तर स्टीव्ह स्मिथ सात धावा करून बाद झाला. पॅट कमिन्सने सहा आणि मिचेल स्टार्कने दोन धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड खातेही उघडू शकले नाहीत. ॲडन झाम्पाने एक नाबाद धावा काढली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक 5 बळी घेतले. हरिस रौफला तीन विकेट मिळाल्या. उसामा मीरने एक विकेट घेतली.