Latest

SA vs AFG : द. आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर 5 गडी राखून विजय

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : SA vs AFG : दक्षिण आफ्रिकेने विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानवर 5 गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. या संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 245 धावांचे लक्ष्य 47.3 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले. रॅसी व्हॅन डर डुसेनने 76 धावांची नाबाद खेळी खेळली. सलामीवीर क्विंटन डी कॉकने 41 आणि डेव्हिड मिलरने 24 धावांचे योगदान दिले. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबी आणि राशिद खान यांनी 2-2 विकेट घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेची चांगली सुरुवात

245 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली. क्विंटन डी कॉकने झटपट धावा केल्या. त्याला कर्णधार टेंबा बावुमाने चांगली साथ मिळाली. संघाने 10 षटकात बिनबाद 57 धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 66 चेंडूत 64 धावा जोडल्या. मात्र, यानंतर द. आफ्रिकेचे फलंदाज थोडे फसताना दिसले. बावुमा (23), डी कॉक (41), एडन मार्कराम (25) आणि हेनरिक क्लासेन (10) लवकर बाद झाले. 5व्या विकेटसाठी डेव्हिड मिलर (24) आणि ड्युसेन यांनी 58 चेंडूत 43 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

ड्युसेनची लढाऊ खेळी

द. आफ्रिकेच्या वतीने, ड्युसेनने अत्यंत लढाऊ अर्धशतकी खेळी खेळून संघाला केवळ सामन्यात रोखलेच नाही तर विजयाकडे नेले. शानदार फलंदाजी करत त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 14वे अर्धशतक आणि या विश्वचषकातील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. 107 चेंडूत 97 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. यादरम्यान त्याने 90.65 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि 7 चौकार आणि 3 शानदार षटकारही मारले.

अफगाणिस्तानची भेदक गोलंदाजी

फलंदाजीत सन्मानजनक धावसंख्या उभारल्यानंतर अफगाणिस्तानने गोलंदाजीतही पूर्ण ताकद लावली. मोहम्मद नबीने 10 षटकात 35 धावा देऊन 2 बळी घेतले आणि राशिद खानने 10 षटकात 37 धावा देत 2 बळी घेतले. या दोघांनी केवळ विकेट घेतल्या नाहीत तर प्रोटीज संघाला सहज धावाही करू दिल्या नाहीत. त्यांच्याशिवाय मुजीब-उर-रहमानने 1 बळी घेतला, तर नवीन-उल-हक आणि नूर अहमद यांनी किफायतशीर गोलंदाजी करूनही त्यांना एकही बळी मिळवता आला नाही.

अफगाणिस्तानने टॉस जिंकला

तत्पूर्वी, अफगाणिस्तानने टॉस जिंकून पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या संघाने वर्ल्ड कप 2023 मधील शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 245 धावांचे लक्ष्य दिले. त्यांनी 50 षटकांत 9 गडी गमावून 244 धावा केल्या. अजमतुल्ला उमरझाईने झुंझार नाबाद 97 धावा फटकावल्या. त्याला रहमत शाहने 26, नूर अहमद 26, रहमानउल्ला गुरबाज 25 आणि रशीद खानने 14 धावांची उपयुक्त साथ दिली. दक्षिण आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झीने 4, तर केशव महाराज आणि लुंगी एनगिडीने प्रत्येकी 2 बळी घेतले. फेहलुकवायोला एक बळी मिळाला.

अफगाणिस्तानची सुरुवात चांगली, पण….

अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली होती. दोन्ही सलामीवीरांनी 8 षटाकांत 41 धावा जोडल्या होत्या. पण 9व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर केशव महाराजने रहमानउल्ला गुरुबाजला (25) बाद करून ही जोडी फोडली. यानंतर अफगाणिस्तानची पडझड सुरू झाली. त्यानंतर इब्राहिम झद्रान (15), रहमत शाह (26), हशमतुल्ला शाहिदी (2), इकराम अलीखेल (12), मोहम्मद नबी (2) आणि रशीद खान (14) विशेष कामगिरी करू शकले नाहीत. या डावाची मधली षटके दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या नावावर राहिली.

दरम्यान, अजमतुल्ला ओमरझाईने रहमत शहासोबत 49 आणि रशीदसोबत 44 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारींच्या जोरावर संघाला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. 40व्या षटकानंतर संघाची धावसंख्या 7 बाद 173 होती.

अजमतची 97 धावांची झुंझार खेळी

अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये चमकदार कामगिरी केली. रशीद बाद झाल्यानंतर अजमतुल्ला उमरझाईने नूर अहमद (26 धावा) सोबत 44 आणि मुजीब उर रहमानसोबत 22 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. तो 97 धावा करून नाबाद परतला. संघाने शेवटच्या 10 षटकांत 3 गडी गमावून 71 धावा केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT