कोल्हापूर : आसुर्ले-पोर्ले येथील दालमिया साखर कारखान्यातील आणि आसवणी प्रकल्पातील रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे या भागातील शेकडो एकर शेतीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी कारखान्याच्या आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
दालमिया साखर कारखाना आणि कारखान्याच्या आसवणी प्रकल्पातून दररोज हजारो लिटर रसायनमिश्रित सांडपाणी कारखान्याच्या पश्चिम बाजूकडील वाहत्या ओढ्यात सोडले जाते. पूर्वी आसुर्ले आणि पोर्ले गावातील नागरिक आणि शेतकरी कपडे धुण्यासह जनावरांना पाजण्यासाठी या ओढ्याचे पाणी वापरत होते. मात्र, दालमिया शुगरने या ओढ्यात आपले रसायनमिश्रित पाणी सोडायला चालू केल्यापासून या ओढ्याचे संपूर्ण पात्र प्रदूषित झाले आहे. त्यामुळे कोणत्याही कारणासाठी नागरिकांना आता या ओढ्याच्या पाण्याचा वापर करता येत नाही.
कारखान्यातून ज्यावेळी मोठ्या प्रमाणात हे प्रदूषित पाणी ओढ्यात सोडले जाते, त्यावेळी हे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरून शेतातील उसासह अन्य पिके करपून जातात, अशा या भागातील शेतकर्यांच्या तक्रारी आहेत. पावसाळ्यात हा ओढा दुथडी भरून वाहत असतो. तशातच कारखान्यातील प्रदूषित पाणी मोठ्या प्रमाणात ओढ्यात सोडले जाते. परिणामी, हे प्रदूषित पाणी अगदी हमखास आजूबाजूच्या शेत-शिवारात पसरून शेती नापीक होण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हे असेच सुरू राहिल्यास कारखान्याच्या रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे या ओढ्याच्या दोन्ही तीरांवरील शेती कायमस्वरूपी नापीक होण्याचा धोका शेतकर्यांमधून वर्तविण्यात येत आहे.
पूर्वी आसुर्ले, पोर्ले, केर्ली या गावांमधील शेती भाजीपाला पिकासाठी सर्वोत्तम समजली जात होती; मात्र जेव्हापासून या कारखान्याने आपले रसायनमिश्रित सांडपाणी ओढ्यात सोडायला चालू केले आहे, तेव्हापासून या भागातील भाजीपाला शेती जणू काही नामशेष झाल्यात जमा झाली आहे. रासायनिक पाण्यामुळे भाजीपाला जागेवर करपून जाऊ लागला आहे. त्यामुळे शेतकरी आता भाजीपाला करण्याचे धाडसच करेनासे झाले आहेत.
दालमिया कारखान्यातील या रासायनिक सांडपाण्याबद्दल या भागातील नागरिकांनी आजपर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे शेकडो तक्रारी केल्या आहेत; पण कारखाना प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रणची हातमिळवणी असल्यामुळे या बाबतीत कोणतीही ठोस कारवाई होत नाही, असा या भागातील नागरिक आणि शेतकर्यांचा आक्षेप आहे. कारखान्याच्या रासायनिक पाण्याबद्दल कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे कारखाना रात्रंदिवस बिनधास्तपणे आपले प्रदूषित पाणी ओढ्यात सोडत आहे. त्यामुळे आता कारखाना आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ या दोन्ही यंत्रणांना योग्य धडा शिकविण्यासाठी लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू करण्याचा इशारा या भागातील शेतकर्यांनी दिलेला आहे.
निर्णायक स्वरूपाचा लढा सुरू करणार
कारखान्याच्या प्रदूषित पाण्याबद्दल आजपर्यंत ग्रामपंचायतीने आणि नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत; पण कुणाची तक्रार आली की, प्रदूषण नियंत्रण मंडळ कारखान्याला एक नोटीस बजावते, कारखानाही या नोटिसीला कागदोपत्री काही तरी थातूरमातूर उत्तर देतो आणि पुन्हा मागे तसे पुढे सुरू राहते. गेली अनेक वर्षे हा असाच कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे या भागातील शेतीचे अपरिमित नुकसान सुरू आहे. हे असेच सुरू राहिले, तर या भागातील शेकडो एकर शेती नापीक बनण्याचा धोका आहे. त्यामुळे लवकरच कारखान्याच्या या प्रदूषणाबद्दल निर्णायक स्वरूपाचा लढा सुरू करण्यात येणार आहे.
– तानाजी भोपळे, सरपंच, पोर्ले