Latest

ठाणे स्थानकातील प्रचंड गर्दीने जीव टांगणीला; रोज पाच लाख प्रवासी

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक महत्व असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकात दिवसेंदिवस गर्दी वाढते आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ठाणे स्थानकातील प्रवासी संख्येत 9 टक्यांनी वाढ झाली आहे. यामुळे सकाळी आणि सायंकाळी पीक अवरच्या वेळी ठाणे स्थानकातून प्रवास करणे अधिक अवघड झाले आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे हे महत्वाचे स्थानक आहे. या स्थानकातून सीएसएमटी ते डोबिवली, कल्याण, कसारा, कर्जत , खोपोलीकरिता अप-डाऊन धिम्या-जलद मार्गावर लोकल ये-जा करतात. अप-डाऊन दोन्ही मार्गावर मेल-एक्सप्रेस धावतात. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी-नेरुळ-पनवेल दरम्यान देखील वाहतूक होते. त्यामुळे ठाणे स्थानकातून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी ठाणे स्थानकातून लोकल पकडणे किंवा स्थानकात उतरण्यासाठी प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो . अनेकदा लोकलच्या गर्दीचे प्रवासी हकनाक बळी ठरत आहेत.

सीएसएमटी ते खोपोली-कसारा दरम्यान सर्वाधिक गर्दीच्या 10 स्थानकात ठाणे पहिल्या क्रमांकावर आहे. ठाणे स्थानकातून दररोज सुमारे 5 लाख 14 हजार 849 प्रवासी प्रवास करतात. गेल्या वर्षी 4 लाख 70 हजार 725 प्रवासी प्रवास करायचे. ही संख्या फक्त पास आणि तिकिट धारकांची आहे. रोज विनातिकिट प्रवासी किती असतील, याचा अंदाज नाही.

ठाणे स्थानकातील गर्दीचे विभाजन करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) एमयूटीपी अंतर्गत कळवा-ऐरोली एलिव्हेटेड प्रकल्प मंजूर करून घेतला. त्यामुळे कल्याणवरून थेट नवी मुंबईला पोहोचणे शक्य होणार आहे. मात्र कळव्यातील प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे हा प्रकल्प आजही रखडलेला आहे.

गर्दीचा ताण

ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना उभे राहण्यास मोकळी जागा मिळावी यासाठी रेल्वेने स्टॉल हटविण्यास सुरुवात केली आहे. परंतु तरीही प्रवाशांना जागेची कमतरता भासत आहे. त्यातच अप-डाऊन मार्गावरील लोकल एकाच वेळी स्थानकात आल्या तर पादचारी पुलावर प्रचंड गर्दी होते. पुलावर चढण्यासाठी-उतरण्यासाठी धक्काबुक्की होते. याशिवाय लोकलमधील गर्दीमुळे तोल जाण्याच्या घटना देखील घडत आहेत. 27 मार्च रोजी रेल्वे पोलीस कर्मचारी रोहित किलजे यांचा मृत्यू हा गर्दीचा बळी ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT