hottest places in the world 
Latest

Hottest places : ही आहेत जगातील सर्वात ‘उष्ण’ ठिकाण

मोनिका क्षीरसागर

सध्या आपल्या देशातील लोक कडक उन्हाळ्याचा सामना करीत आहेत. राजस्थानच्या श्रीगंगानगर येथील तापमान अतिशय जास्त असते. वाराणसीतही यंदा, सोमवारी 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. इतके तापमान लोकांना 'त्राही माम्' करून सोडू शकते, यामध्ये नवल नाही; पण यापेक्षाही अधिक तापमान असलेली अनेक ठिकाणे जगात आहेत. त्यांची ही माहिती…

डेथ व्हॅली

जगातील सर्वात उष्ण ठिकाणांमध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीचा समावेश होतो. 10 जुलै 1913 या दिवशी तर याठिकाणी असलेल्या 'फरनेस क्रीक' नावाच्या जागी कमाल 56.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. उष्ण वारे कोंडून राहत असल्याने इथे इतकी उष्णता असते असे म्हटले जाते. आजुबाजूच्या वाळवंटातून ही उष्ण हवा इथे येत असते.

फ्लेमिंग माऊंटन

चीनचा फ्लेमिंग माऊंटन नावाचा पर्वत टकलामाकेन वाळवंटाच्या उत्तर भागात आहे. शिनजियांग प्रांताच्या तियानशान येथे तांबड्या वालुकाश्माचे पर्वत आहेत. त्यांना 'फ्लेमिंग माऊंटन्स' किंवा 'हुओयान माऊंटन्स' असे म्हटले जाते. या पर्वतांची लांबी 100 किलोमीटर आणि रुंदी पाच ते दहा किलोमीटर आहे. उन्हाळ्यात येथील तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. 2008 मध्ये येथे 66.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असे म्हटले जाते; पण त्याची पुष्टी झाली नाही.

लूट वाळवंट

इराणमध्ये 'दश्त-ए-लूट' नावाचे वाळवंट आहे. ते युनेस्कोच्या जागतिक वारशांच्या यादीतही समाविष्ट आहे. हे जगातील 34 व्या क्रमांकाचे सर्वात मोठे वाळवंट आहे. त्याची लांबी 480 किलोमीटर आणि रुंदी 320 किलोमीटर आहे. याठिकाणी वनस्पती किंवा सजीवांचे अस्तित्व नाही. 'नासा'ने अ‍ॅक्‍वा सॅटेलाईटच्या माध्यमातून या वाळवंटाच्या पृष्ठभागावरील तापमान 2003 ते 2010 पर्यंत मोजले होते. हे तापमान 70.7 अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते!

सहारा वाळवंट

हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. तेथील सरासरी तापमान 35 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत असते. याठिकाणी वर्षभरात 100 मिलिमीटरपेक्षाही कमी पाऊस पडतो. तेथे कमाल 58 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. तसेच पृष्ठभागाचे तापमान 76 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

अल अझिझिया

लिबियाच्या वायव्येकडील भागात हे वाळवंट आहे. हा जाफरा जिल्ह्यातील एक भाग आहे. तेथे सर्वसाधारणपणे 35 ते 40 अंश सेल्सिअस तापमान असते. मात्र, 13 सप्टेंबर 1922 मध्ये याठिकाणी 58 अंश सेल्सिअस तापमानाचीही नोंद झालेली आहे. अर्थात जागतिक हवामान संघटनेने त्यावर शंका व्यक्‍त केली आहे. त्या काळात या परिसरात तापमान मोजण्याच्या सुविधा नव्हत्या, असे या संघटनेचे म्हणणे आहे. अर्थात इथे मोठीच उष्णता असते हे उघडच आहे!

सोनोरन वाळवंट

हे वाळवंट अमेरिकेपासून उत्तर मेक्सिकोपर्यंत पसरलेले आहे. याठिकाणी जीवघेणी उष्णता असते व तेथील निवडुंगही धोकादायक असतात. हे वाळवंट अ‍ॅरिझोना प्रांतात असून तिथे काही दुर्मीळ जग्वार प्राणीही आढळतात. याठिकाणाचे सरासरी तापमान 46.1 अंश सेल्सिअस आहे.

डलोल

इथियोपियाच्या उत्तर भागातील हे छोटेसे गाव आहे. संपूर्ण वर्षभर इथे पारा चढलेलाच असतो. याठिकाणी नेहमी कमाल तापमान 41.2 अंश सेल्सिअस असते. हे मानवी वसाहत असलेले सर्वात उष्ण ठिकाण असल्याचे म्हटले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT