नोकरी, व्यवसायात अनेक अडेलतट्टूंचा मुकाबला करण्याची वेळ येते. काही लोक नुसताच वाद घालत असतात, तर काही नुसत्या तक्रारी करत असतात. काही उगाचच लाळघोटेपणा करतात. अशा सगळ्या प्रवृत्तीच्या आणि स्वभावाच्या लोकांना हाताळणे कौशल्याचे काम आहे; पण हे कौशल्य अंगी बाळगणे कठीण नाही. आत्मविश्वासाने आणि कुणाला काय वाटेल, याची पर्वा न करता अशा लोकांना सामोरे जा आणि त्यांना ताळ्यावर आणा. अशा लोकांशी कसे वागायचे, याच्या या काही टिप्स…
दुर्लक्ष करा
काही जण असे असतात की, त्यांच्याशी वाद घालण्यातच काय पण साधे बोलण्यातही अर्थ नसतो. अशा मंडळींच्या बोलण्याकडे सरळ दुर्लक्ष करा. विशेषत: नकारात्मक विचार करणार्या मंडळींकडे तर आजिबात लक्ष देऊ नका. भले ही मंडळी तुमची नातेवाईक किंवा सहकारी असतील, त्यांच्याकडे लक्ष न देणेच उत्तम.
वाद कुठे घालायचा, याचे भान ठेवा
एखादी व्यक्ती तुमच्याशी वाद घालत असेल, तर तिला शांत करायचे की, तिच्याबरोबर वाद घालत राहायचे, हे तुम्ही कुठे आहात, हे पाहून ठरवा. तुम्ही कस्टमर केअर सर्व्हिसमध्ये असाल आणि आलेल्या एखाद्या कॉलवर वादाचा प्रसंग असेल, तर तिथे संयम बाळगा. कारण, फोनवर पलीकडून बोलणार्या व्यक्तीशी वाद घालण्यात काही अर्थ नसतो.
ऑफीसमध्ये एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत नसेल, पण त्याच्यातील एखादा गुण घेण्यासारखा असेल, तर केवळ तो आवडत नाही म्हणून त्याच्याशी वाद घालू नका. ऑफिस किंवा घर कुठेही ज्या व्यक्तीबरोबर वाद घालायची वेळ येते, ती व्यक्ती कशी आहे आणि कोण आहे, याचेही भान ठेवण्याची गरज असते.
शांत राहा
काही लोक अविचारी आणि अतर्क्य असतात. त्यांच्या बोलण्यात विवेकाचा लवलेशही नसतो. अशा लोकांसमोर शांत राहणेच योग्य. अशा लोकांसमोर तुम्ही जितक्या शांत राहाल, तितकी परिस्थिती लवकर आटोक्यात येईल. अविचारी लोकांसमोर रागाने बोलण्याने परिस्थिती बिघडते. म्हणूनच शांत राहणे चांगले. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी दहा आकडे हळहळू मोजा. ते मोजता मोजता समोरच्या व्यक्तीला समजावण्याचा मार्ग तुम्हाला सापडू शकतो.
विनयशील राहा
इतरांचे बोलणे संयमाने ऐकणे आणि त्याच्यावर ठाम पण नम्रपणे प्रतिक्रिया देणे हे संवादाचे योग्य माध्यम आहे. मृदूपणाने आणि नम्रपणे वागण्याने समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल विश्वास वाटू लागतो.
स्पष्ट बोला
एखादा न पटणारा किंवा चुकीचा मुद्दा असेल, तर समोरच्याला तो शांतपणे, पण स्पष्टपणे सांगा. कुणीतरी तुमच्यावर दादागिरी करायचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा विरोध करा. तुमचा आत्मविश्वास पाहून तो गप्प बसेल.
हसत खेळत राहा
आपल्या सहकार्यांत, मित्रमैत्रिणींत हसतखेळत राहा. चेष्टा-मस्करी, विनोदी संभाषण यातून मैत्री अधिक घट्ट होते. त्यामुळे गंभीर प्रश्नही सोपे वाटू लागतात आणि आयुष्य म्हणजे समस्यांचा डोंगर वाटत नाही.
हेही वाचा :