Latest

Late night dinner : रात्री उशिरा जेवताय? वेळीच सावध व्‍हा…जाणून घ्‍या आरोग्‍यावर होणार्‍या दुष्परिणामांविषयी

Arun Patil

रात्रीचे जेवण उशिरा घेण्याचे अनेक दुष्परिणाम आरोग्यविषयक अभ्यासांमधून समोर आले आहेत. कामातल्या व्यस्ततेमुळे किंवा धावपळीच्या जीवनशैलीमुळे या दुष्परिणामांना अनेकांना तोंड द्यावे लागत आहे. Late night dinner चे दुष्परिणाम नेमके कोणते, ते समजून घेऊया आणि त्यांना आपल्यापासून चार हात दूरच ठेवूया..!

लेट नाईट डिनर ही संकल्पना आता काही फार अनोखी राहिलेली नाही. उलट कळत नकळत ती आपल्यातल्या अनेकांच्या दैनंदिन जीवनाचाच भाग झाली आहे. खरे तर निरोगी आयुष्यासाठी वेळेवर उठणे, वेळेवर झोपणे आणि योग्य वेळी खाण्याच्या नियमानुसार, आहार घेणे हे सुद़ृढ मानवी जीवनासाठी यथायोग्य मानले गेले आहे; पण ते आचरणात आणणारे लोक आता विरळेच! अर्थात, आपण 'लवकर निजे- लवकर उठे'च्या तालावर वावरणारे असलो किंवा 'लेट नाईट डिनर'वाले; आपण जसे जीवन जगतो, आपली जी दिनचर्या आहे त्याचे परिणाम काय असू शकतात, हे मात्र आजच्या जगात प्रत्येकाने समजून घेतलेलेच बरे.

अभ्यासक असे सांगतात की, आपण जर रात्री उशिरा जेवत असाल, तर तुम्हाला पुढे नोंदवलेल्या गोष्टींचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे.

Late night dinner लठ्ठपणाच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण

रात्री उशिरा सेवन केलेले जेवण पचवणे कठीण असते. त्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते. अर्थातच हृदयरोगाचा धोकाही वाढण्याची शक्यता बळावते. तसेच जेवण केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा व्यायाम शरीराला होत नाही. उच्च रक्तदाबाची समस्याही डोके वर काढू शकते. रात्री उशिरा जेवण करणे हे लठ्ठपणाच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण आहे, हेही आपल्यातल्या अनेकांनी समजून घेतले पाहिजे आणि स्वत:च्या बाबतीत ताडूनही पाहिले पाहिजे.

लेट नाईट डिनरमुळे झोपेवर परिणाम होतो, असेही अनेक अभ्यासांमधून दिसून आले आहे. बर्‍याचदा रात्री उशिरा जेवण्याने पचनसंस्था नीट कार्यरत होऊ शकत नाही. ज्या व्यक्तींना आधीच अपचनाचा त्रास आहे, त्यांनी तर कधीही उशिरा जेऊ नये. त्यांचा अपचनाचा त्रास अजून वाढू शकतो. यामुळे अस्वस्थता येते. काहींना घाबरल्यासारखे होते आणि झोप येत नाही. काहींना अपुर्‍या झोपेमुळे दुसर्‍या दिवशी दिवसभर थकवा आणि तणाव जाणवतो. मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही. परिणामी चिडचिडेपणा येतो. मन एकाग्र होण्यात अडचण येते. त्यामुळे तणावमुक्त जीवन जगण्यासाठी लेट नाईट डिनर टाळा. रात्री लवकर जेवण करा आणि शतपावलीदेखील करा, असा सल्ला आवर्जून दिला जातो.

* उशिरा केलेले जेवण पचवणे कठीण
* कुठल्याही प्रकारचा व्यायाम होत नाही
* उशिरा जेवण करणे हे लठ्ठपणाचे कारण
* पचनसंस्था नीट कार्य करू शकत नाहीत                                                                                                                        * झोपेवर परिणाम होऊन अपचनाचा त्रास वाढू शकतो                                                                                                        * मन एकाग्र होण्यात अडचण येते, चिडचिडेपणा येतो.

डॉ. मनोज शिंगाडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT