आजच्या काळात प्रदूषणापासून स्वत:चे रक्षण करणे आता खूप आवश्यक बनले आहे. याचे कारण प्रदूषण आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी आणि शरीराच्या आतील प्रत्येक इंद्रियासाठी धोकादायक ठरत आहे. प्रदूषित हवेतील पार्टिकुलेट मॅटर- पीएम 2.5 आणि त्यापेक्षाही लहान आकाराचे प्रदूषण कण आपल्या फुफ्फुसांतून सहजपणे शरीरातील पेशींमध्ये घुसतात. त्यानंतर रक्तप्रवाहातून ते शरीरातील सर्व भागांतील पेशींवर परिणाम करतात. हे कण फुफ्फुसांत गेल्यावर तेथून रक्तात जातात. त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. साहजिकच अल्झायमर्सचा धोका त्यामुळे वाढतो. संशोधनातून असे आढळून आले आहे की दीर्घकाळ जर पीएम 2.5, नायट्रोजन डायऑक्साईड आणि कार्बन मोनोऑक्साईडशी संपर्क आल्यास डिमेन्शिया किंवा वृद्धांमध्ये समजण्याची क्षमता घटत जाते. प्रदूषित वातावरणात सतत राहिल्याने डोळ्यांत कोरडेपणा येणे, अॅलर्जी होणे, वेदना होणे याबरोबरच आपले अश्रू अॅसिडिक होण्याचा धोका असतो. त्यामुळे डोळ्यांचे नुकसान होते आणि द़ृष्टी अधू होते.
प्रदूषणामुळे सांधेदुखीचा त्रास वाढतो. श्वास घेताना पीएम 2.5 कण श्वासनलिकेत जातात. त्यामुळे श्वासनलिकेला सूज येते आणि त्यामुळे शरीरात एन्जायमेटीक रिअॅक्शन होते आणि सांधेदुखी सुरू होते. प्रदूषणामुळे हृदयातील वाहिन्यांमध्ये बाधा निर्माण होते. प्रदूषित वातावरणात म्हणूनच चेहर्यावर मास्क लावूनच बाहेर पडावे आणि अशा वातावरणात हृदयाची धडधड वाढेल, अशी कोणतीही कामे करू नयेत. प्रदूषणामुळे आपले केसही गळू लागतात आणि केसांची चमक नाहीशी होते. त्याचबरोबर त्वचेवरही डाग पडू लागतात, त्वचा कोरडी होते. त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. त्वचेचा कर्करोग होण्याचीही शक्यता असते. प्रदूषणामुळे दमा, बाँकाईटीस यासारखे आजार होतात. श्वासनलिकेला संसर्ग होण्याचा धोका वाढतो. जसे घराबाहेरचे प्रदूषण आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करते, तसे घरातील प्रदूषणही करते. घरातील हवा दोन प्रकारे प्रदूषित होते. त्यातील एक म्हणजे वोलाटाईल ऑर्गेनिक कंपाऊंड आणि दुसरे सेमी वोलाटाईल ऑर्गेनिक कंपाऊंड.
1. वोलाटाईल ऑर्गेनिक कंपाऊंड (व्हीओसी) – यात आपण घरात फवारत असलेल्या विविध स्प्रेंचा गंध असतो. हा गंध अतिशय वेगाने आणि सहजपणे वायू किंवा वाफ बनून हवेत मिसळतो आणि हवा प्रदूषित करतो. एयर फ्रेशनर, परफ्यूम, डास मारण्यासाठी फवारलेला स्प्रे, झुरळे मारण्यासाठी फवारलेला स्प्रे, सर्व प्रकारचे क्लिनिंग एजंट, कॉस्मेटिक्स, रंग आणि गॅस असलेले सर्व सुगंधी पदार्थ यामुळे घरातील प्रदूषण वाढते.
2. सेमी वोलाटाईल ऑर्गेनिक कंपाऊंड (एसव्हीओसी) – फर्निचर, कीटनाशक, डासांना पळवून लावणारी क्रीम, बिल्डिंग मटेरियल वगैरे. यातून बाहेर पडणारे केमिकल हळूहळू, पण दीर्घकाळापर्यंत घरातील हवा प्रदूषित करत राहतात.
या पार्श्वभूमीवर निरोगी जीवनासाठी, तंदुरुस्तीसाठी आणि दीर्घायुषी होण्यासाठी प्रदूषणविरहित, निसर्गस्नेही जीवनशैली अंगिकारली पाहिजे. प्रदूषणयुक्त वातावरणात जाताना मास्कचा वापर, हातांची स्वच्छता यासारखी काळजी घेतानाच नियमितपणाने प्राणायाम, योगासने, जॉगिंग, फुफ्फुसांचे व्यायाम करणे काळाची गरज आहे.