लंडन : मधमाश्यांचे सामूहिक जीवन हा नेहमीच माणसासाठी कुतूहलाचा विषय बनून राहिलेला आहे. त्यांच्या पोळ्यातील मध हा आदिम काळापासून मानवाचा एक आहार आहे. हा मध मधमाश्या कसा बनवतात याबाबतही सर्वांना उत्सुकता असते.
कष्टकरी मधमाश्यांना फुलं व त्यामधील परागकणांच्या शोधासाठी अगदी पाच किलोमीटर अंतरापर्यंतही उडत जावे लागते. एका खेपेत त्या 50 ते 100 फुलांवर बसतात. फुलातील मधुरस किंवा परागकण हाच मध तसेच मधमाश्यांच्या ऊर्जेचा प्रमुख घटक आहे. आपल्या स्ट्रॉसारख्या लांब जिभेने त्या फुलांमधून हा रस ओढून घेतात. तो मधमाश्यांच्या पोटातील खास मधासाठीच्या कप्प्यात साठवला जातो. या रसातील साखरेची संयुगे तोडली जातात व त्यापासून घनरूपात येणारी साधी साखर बनण्यास मदत होते. त्यांच्या पोटातील मधाचा कप्पा पूर्णपणे भरण्यासाठी त्यांना एक हजारपेक्षाही अधिक फुलांना भेट द्यावी लागते.
या रसापासून मध बनवण्यासाठी पोळ्यातील तापमान 33 अंश सेल्सिअस असावे लागते. त्यामुळे मधुरसातील पाण्याचा अंश बाष्पीभूत होऊन निघून जातो. त्यासाठी मधमाश्या आपले पंख हलवूनही साखरेचे प्रमाण 18 ते 19 टक्के येण्यापर्यंत प्रयत्न करतात. त्यांच्या विशिष्ट ग्रंथीतूनही अशी एन्झाईम्स स्रवतात की, त्यामुळे सुक्रोज बाँडचे रूपांतर मोनोसॅक्राईड्स, ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये होते. ज्यावेळी ते पातळ होते, त्यावेळी पोळ्याच्या कप्प्यांना झाकण लावले जाते. तयार झालेला हा पदार्थ म्हणजेच मध!