पुणे; पुढारी वृत्तसेवा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाल्यानंतर पडलेल्या गोळ्यांवर केएफ (खडकी फॅक्टरी) असा मार्क आहे. तिथे खडकी फॅक्टरीमधून गोळ्या कशा आल्या, याचा तपास केला का? त्यांच्या खिशातील चाव्या कोणत्या खोलीच्या किंवा कपाटाच्या होत्या, हे पाहिले का? सकाळी लोंढे नावाचा पोलिस त्या ठिकाणी कसा आला?
असे विचारले असता 'नाही' असे उत्तर डेक्कनचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक व निवृत्त सहायक पोलिस आयुक्त मनोहर जोशी यांनी उलट तपासणी दरम्यान दिले, अशी माहिती बचाव पक्षाचे वकील अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी दिली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर कोर्टात सुरू आहे. याप्रकरणी सचिन अंदुरे, शरद कळसकर, डॉ. वीरेंद्र तावडे, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत.
2 मार्चला सुनावणी
जोशी यांनी तपास कधी हस्तांतरित केला, तो करताना कोणती कागदपत्रे दिली, कुणाकुणाचे स्टेटमेंट घेतले, याविषयी उलटतपासणी झाल्याचे सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी सांगितले. पुढील सुनावणी 2 मार्चला होणार आहे.