कोल्हापूर, अनिल देशमुख : जिल्ह्यातील मधाचे गाव म्हणून ओळख निर्माण करत असलेल्या पाटगावात आता 'हनी टूरिझम' सुरू होणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे गावासह परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव हे मधाचे गाव म्हणून विकसित केले जात आहे. या गावात आता मधमाशी पर्यटन (हनी टूरिझम) अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. याकरिता पाटगावात 'मधमाशी'च्या थीमवर सजावट करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतीची इमारत मधमाशीच्या चित्रांनी रेखाटली आहे. याच पद्धतीने गावातील मुख्य रस्त्यावरील काही घरांनाही याच धर्तीवर सजवले जाणार आहे. ग्रामपंचायत इमारतीच्या दुसर्या मजल्यावर मधमाशी आणि मध उत्पादन याबाबतची माहिती द़ृकश्राव्य माध्यमातून दिली जाणार आहे. माहिती फलक, छायाचित्रांसह येथे येणार्या पर्यटकांना मधमाशीचे निसर्गातील महत्त्व, त्यांचे जीवन, मध उत्पादन कसे होते आदी माहिती देणारी काही मिनिटांची चित्रफीतही दाखवली जाणार आहे.
गावातच दोन ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारले जाणार आहेत. त्याचीही थीम मधमाशी धर्तीवरच ठेवली आहे. मधमाश्या, त्यांचे महत्त्व, त्यांचे प्रकार आदी सर्व माहिती घेतल्यानंतर प्रत्यक्ष जंगलात मध उत्पादन कसे होते, याचेही दर्शन घडवले जाणार आहे. पर्यटकांना मधपेट्यातील मधाचा गोडवा प्रत्यक्ष चाखता येणार आहे.
एक दिवसीय सहलीसह निवासी सहलींचे होणार आयोजन
'हनी टूरिझम'साठी कोल्हापुरातूनही एक दिवसीय तसेच निवासी सहलीचे आयोजन करता येईल, या दृष्टीने यंत्रणा विकसित केली जाणार आहे. पाटगावला भेट दिल्यानंतर मौनी महाराज मठ, पाटगाव धरण, रांगणा किल्ल्यालाही पर्यटकांना भेट देता येईल. तसेच मध उत्पादन कसे केले जाते, हे जंगलात जाऊन पर्यटकांना दाखवले जाणार आहे. याचा एक दिवसीय, दोन दिवसीय ट्रॅक तयार केला जाणार आहे. याकरिता कोल्हापुरातून दाजीपूर सफारीच्या धर्तीवर पाटगाव हनी टूरिझमसाठी विशेष वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे.
स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार
पर्यटकांना चहा-नाश्ता, जेवण तसेच निवासाची व्यवस्था या सर्व गावातच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याद्वारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. पर्यटकांना जंगलात येऊन प्रत्यक्ष मध उत्पादनाची माहिती देणे, यासह परिसरातील पर्यटन घडवून आणण्यासाठी परिसरातील तरुणांना प्रशिक्षित केले जाणार आहे. स्थानिक उत्पादनाबरोबर मध आणि मधापासून तयार होणार्या पदार्थांची विक्रीही केली जाणार आहे. याद्वारे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
पाटगाव मधाचे गाव म्हणून विकसित होत आहे, त्याचा उपयोग करून हनी टूरिझम ही संकल्पना राबविली जात आहे. याकरिता निधीचीही तरतूद केली आहे. या पर्यटनातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होईल, यादृष्टीने आराखडाही तयार केला जात आहे.
– राहुल रेखावार, जिल्हाधिकारी