पुढारी ऑनलाईन : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे खलिस्तानवाद्यांनी स्वामी नारायण मंदिराची विटंबना केली आहे. मेलबर्न येथील मिली पार्क परिसरात हे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरावर भारतविरोधी आणि हिंदू विरोधी घोषणा चित्तारण्यात आल्याचे गुरुवारी सकाळी निदर्शनास आले. (Hindu temple in Australia defaced)
स्वामी नारायण मंदिराच्यावतीने या घटनेचा निषेध केला आहे. हा प्रकार हुल्लडबाजी आणि द्वेषपूर्ण आहे. या घटनेमुळे आम्हाला दुःख झाले आहे. शांतता आणि सद्भावना यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, असे मंदिराच्यावतीने सांगण्यात आले.
या परिसरातील खासदार इव्हान मुलहोलांड यांनी घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. "ही हुल्लडबाजी व्हिक्टोरिया परिसरातील हिंदू समाजासाठी खेदकारक आहे," असे त्यांनी म्हटले आहे. केरळ हिंदू संघटनेने या घटनेचा निषेध केला आहे.
या संदर्भात मेलबर्न येथील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे.
मेलबर्न येथील पत्रकार अमित सरवाल म्हणाले, "मी सकाळी मंदिरात गेलो होतो. मंदिराच्या सर्व भिंतींवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदू धर्माविरोधात वाक्ये लिहिण्यात आली होती. खलिस्तानवाद्यांचा हिंदूविरोधातील द्वेष यातून दाखवण्यात आला होता. "
व्हिक्टोरिया राज्याच्या हिंदू परिषदेचे अध्यक्ष मकरंद भागवत यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ऑस्ट्रेलियातील विश्व हिंदू परिषदेने दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
हेही वाचा