Latest

अपघात : ‘महामार्ग संमोहना’चे बळी?

Arun Patil

देशभरात महामार्गांवर होणार्‍या अपघातांत बळी जाणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. या अपघातांना जी अनेक कारणे आहेत, त्यामध्ये 'रोड हिप्नॉसिस' किंवा 'हायवे हिप्नॉसिस' अर्थात महामार्ग संमोहन हेही एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. जगभरात महामार्गांची निर्मिती करताना याचा विचार केला जातो आणि त्यानुसार महामार्गांवर विशिष्ट अंतरानंतर थांबे, सूचना फलक आदींची उभारणी केली जाते. काय आहे हा नेमका प्रकार?

संपूर्ण देशात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या सातत्याने वाढत आहे. चांगले रस्ते असूनही रस्ते अपघात थांबत नाहीत, ही चिंतेची बाब आहे. बहुतांश रस्ते अपघात हे अतिवेगाने, वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे किंवा टायर फुटल्यामुळे होतात. रस्ते अपघातात देशात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे, तर तामिळनाडू दुसर्‍या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र याबाबत देशात तिसर्‍या क्रमांकावर आहे. राज्यात दरवर्षी सुमारे 14,000 हून अधिक मृत्यू रस्ते अपघातात होत आहेत. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावर गेल्या 180 दिवसांत सुमारे 1202 अपघात झाले आहेत. या एक्स्प्रेस वेची एकूण लांबी सुमारे 701 किलोमीटर आहे आणि हा सहा लेनचा महामार्ग आहे. वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून आतापर्यंत या महामार्गावर झालेल्या रस्ते अपघातामध्ये शेकडो जणांचा बळी गेला आहे.

अलीकडेच नागपूरहून पुण्याला जाणार्‍या खासगी बसला झालेल्या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ही बस आधी लोखंडी पोलला धडकली. त्यानंतर रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाली आणि बसने पेट घेतला. बसचा दरवाजा खालच्या बाजूला गेल्याने कोणालाही बाहेर येता आले नाही. हा अपघात टायर फुटल्यामुळे झाल्याचे सुरुवातीला बोलले जात होते; परंतु चालकाचा ताबा सुटल्यामुळे बस धडकल्याचे नंतर स्पष्ट झाले. या दरम्यान हायवे हिप्नॉसिस अर्थात महामार्ग संमोहन हे अशा अपघातांचे एक कारण असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावर होणार्‍या अपघाताचे कारण शोधण्यासाठी तीन महिने संशोधन केले असून त्यातून 'महामार्ग संमोहन' हे जवळपास 33 टक्के अपघातांना कारणीभूत ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. जगभरात महामार्गांची निर्मिती करताना 'हायवे हिप्नोसिस'चा विचार केला जातो. यानिमित्ताने हा नेमका काय प्रकार आहे, हे जाणून घेणे औचित्याचे ठरेल.

लहानपणी दुकानात किंवा शाळेत जाताना वाट लक्षात ठेवण्यासाठी मेंदूला ताण द्यावा लागत नसे. मनात कितीही वेगळे विचार असले तरी सायकलचे पॅडल आणि हँडल आपोआप काम करायचे आणि दुकानापर्यंत घेऊन जायचे. अशा प्रकारे ज्या कामाची सवय होते, त्याला 'स्वयंचलितता' म्हणतात. स्वयंचलिततेमध्ये जेव्हा वाहन चालवताना लक्ष दुसरीकडे जाते, तेव्हा लोक अर्धवट स्मृतिभ्रंशाच्या स्थितीमध्ये जातात. तो एक प्रकारच्या रोड हिप्नॉसिसचा भाग असतो. हायवे संमोहनमध्ये चालकाचे वाहनावर पूर्ण नियंत्रण असते. एक्सलेटर, स्टेअरिंग हे सर्व ड्रायव्हरच्या नियंत्रणात असते. गाडी सुरळीत चालू असते. त्याच त्याच रस्त्यावरून जात असल्याने चालक सरावलेला असतो. साहजिकच अशा वेळी मोकळा रस्ता असेल तर चालकाचे लक्ष दुसरीकडे कुठेतरी जाते. याउलट ड्रायव्हर ट्रॅफिकमध्ये किंवा शहरात वाहन चालवत असतो तेव्हा तो पूर्ण एकाग्रतेने वाहन चालवतो. वाहनचालकाचे मन वाहतुकीत सक्रिय राहते; परंतु मोठ्या महामार्गांवर फारसे ट्रॅफिक नसल्याने वाहनचालकाची एकाग्रता नष्ट होते. आजूबाजूने फक्त गाड्या धावत राहतात. पण मन निष्क्रियतेकडे जाते. या अवस्थेला हायवे हिप्नॉसिस किंवा महामार्ग संमोहन म्हणतात. ढोबळमानाने याचा अर्थ कोणत्याच अडथळ्यांशिवाय एखाद्या महामार्गावर गाडी सरळ एकमार्गे एकाच वेगात अनेक मिनिटे धावत राहिली की, शारीरिक हालचाल स्थिर होऊन मेंदू क्रियेच्या प्रक्रियेसाठी निष्क्रिय बनतो.

अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जी. डब्ल्यू. विल्यम्स यांनी 1963 मध्ये प्रथमतः हायवे संमोहन हा शब्द जगासमोर आणला. त्यापूर्वी 1921 मध्ये वॉल्टर माइल्सच्या 'स्लीपिंग विथ द आयज ओपन' या लेखातही याचा उल्लेख आला होता. त्या लेखात मनाची अवस्था म्हणून या स्थितीचा उल्लेख केला होता. 1929 मध्ये या मनःस्थितीवर संशोधन करण्यात आले आणि असे सांगण्यात आले की, कार चालवणारे लोक डोळे उघडे ठेवूनही झोपतात. तीन तासांपेक्षा जास्त वेळ सतत आणि सलग ड्रायव्हिंग केल्यावर रस्त्याचे संमोहन सुरू होते. हे टाळण्यासाठी महामार्गावरून गाडीने प्रवास करताना थोड्या वेळाने ब्रेक घेतला पाहिजे. गाडीतून उतरून थोडा वेळ चालल्याने मेंदू रिफ्रेश होतो आणि पुन्हा एकाग्रतेसाठी तयार होतो. रात्रीच्या वेळी बर्‍याचदा चालक अर्धनिद्रावस्थेत गाडी चालवत असतो. काही वेळा थकव्यामुळे सुस्तीने गाडी चालवतो. पण हायवे हिप्नॉसिसमध्ये असे होत नाही. इथे चालक सुरुवातीला सक्रिय असतो; पण जसजसा महामार्ग सरू लागतो तसतशी त्या वातावरणाचे संमोहन त्याच्यावर आरूढ होते. चालकाच्या मनात इतर काही गोष्टींचे विचार गर्दी करू लागले की 'हायवे संमोहन' होण्याचा धोका जास्त असतो. ड्रायव्हरला दूरवर कोणतेही वाहन दिसत नाही, तेव्हा तो आपल्या गाडीचा वेग वाढवतो. यामुळे महामार्ग संमोहनाचा धोका अधिक वाढतो. अशा संमोहनात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटण्याचा धोका अनुस्यूत असतो.

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, बहुतांश रस्ते अपघात अशा रोड हिप्नॉसिसमुळे घडतात. काहींच्या मते, साधारणपणे अडीच ते तीन तास सतत ड्रायव्हिंग केल्यावर रस्त्यांचे संमोहन सुरू होते. अशा संमोहन अवस्थेत डोळे उघडे असतात; पण मन निष्क्रिय होते. त्यामुळे जे दिसते त्याचे योग्य विश्लेषण केले जात नाही. साहजिकच या संमोहन अवस्थेत चालकाला ना समोरील वाहने लक्षात येतात, ना स्वतःचा वेग. तशातच 120-140 प्रतितास या वेगाने वाहन धावत असेल तर दुर्लक्षाअभावी अचानक टक्कर होणे अटळ असते. हायवे हिप्नॉसिसला व्हाईट लाईन फिवर असेही म्हटले जाते. अशी संमोहन स्थिती ओळखणे सोपे असते. जर चालकाला गाडी चालवत पुढे जाताना मागील 15 मिनिटांतील काहीही आठवत नसेल तर तो संमोहनाचा इशारा म्हणून ओळखावा.

महामार्गावरून नियमित प्रवास करणार्‍यांनी संमोहनाची ही अवस्था आणि त्यामुळे उद्भवणार्‍या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक अडीच ते तीन तासांनी गाडी चालवल्यानंतर थांबले पाहिजे. थांबल्यानंतर चहा-कॉफी, गरम पाणी प्यावे. 5-10 मिनिटे शरीराला आणि मनाला विश्रांती देऊन मग पुुढे मार्गस्थ व्हावे. वाहन चालवताना स्थान, येणारी वाहने लक्षात ठेवा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लांबच्या प्रवासाला जाताना चालकाची झोप पूर्ण झालेली असणे, पर्यायी चालक गाडीत असणे आवश्यक आहे. रात्रीच्या प्रवासात गाडीतील प्रवासी झोपलेले असल्यामुळे रोड हिप्नॉसिसचा धोका अधिक असतो. याबाबत अधिक आणि नेमके संशोधन होण्याची गरज असेलही आणि होईलही; परंतु तोपर्यंत याबाबत चालकांना आणि प्रवाशांना याबाबतची माहिती देणे गरजेचे आहे. त्यातून दुर्घटना कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

प्रसाद पाटील 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT