पुणे, पुढारी वृत्तसेवा: पाडव्याच्या मुहूर्तावर गाडी मिळावी ही प्रत्येक वाहनचालकाची इच्छा असते, त्याकरता आरटीओ कार्यालयात वाहन चालकांनी सध्या चॉईस क्रमांक, व्हीआयपी क्रमांक घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे. त्यातच भर म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे येथे आलेल्या नागरिकांना गेल्या तीन-तीन दिवसापासून हेलपाटे मारावे लागत आहेत. येथील कामासाठी कर्मचारीच नसल्यामुळे कार्यालयातील अनेक कामे ठप्प आहेत, यात सोमवारी पुणे आरटीओ कार्यालयात व्हीआयपी नंबर साठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यावेळी आरटीओचे निरीक्षक स्वतःच व्हीआयपी नंबर वाटपाचे काम करताना पाहायला मिळाले. नियमित कर्मचारी नसल्यामुळे कामाला विलंब होत असून, नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी संप तातडीने संपवुन वाहनचालकांचे होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
यासंदर्भात आरटीओमध्ये व्हीआयपी नंबर घेण्यासाठी आलेले वाहन चालक संतोष घुले म्हणाले, मी सफारी कार घेतली आहे. मी गेल्या दोन-तीन दिवसांपासून आरटीओ कार्यालयात चकरा मारत आहे. रोज मांजरी येथून येतो, इथे आल्यावर असलेल्या गर्दीमुळे मला वैताग आला आहे. गेल्या 16 तारखेला डीडी काढलाय, अजूनही नंबर मिळत नाही. नंबर मिळाला नाही तर मला गाडी कशी मिळणार… खूपच मनस्ताप होत आहे.