गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत असल्याने नदी, नाल्यांना पूर आला असून, १२ हून अधिक मार्गांवरील वाहतूक बंद झाली आहे. मागील चोवीस तासांत कोरची तालुक्यात १६१.३ मिलीमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल कुरखेडा तालुक्यात १२२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
पावसामुळे गडचिरोली-आरमोरी,गडचिरोली-चामोर्शी, आलापल्ली-भामरागड या प्रमुख मार्गांसह कोरची-भिमपूर-बोटेकसा, कोरची-मसेली-बेतकाठी, कुरखेडा-वैरागड, वैरागड-पातलवाडा, लाहेरी-बिनामुंडा, अहेरी-लंकाचेन, अहेरी-वट्रा, अहेरी-देवलमरी इत्यादी मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असून, गोंदिया जिल्ह्यातील इटिया डोह धरणदेखील ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केली आहे.