बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामती शहराला गुरुवार २५ मे रोजी दुपारी चारपासून मुसळधार वादळी पावसाने झोडपून काढले. पावसापेक्षा वाऱ्याचा वेग प्रचंड होता. वेगवान वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मुसळधार पावसामुळे दिलासा मिळाला. परंतु, या पावसाने नुकसानही अधिक केले.
गेल्या आठवडाभरापासून बारामतीत सूर्य आग ओकतो आहे. तापमान ४० अंश सेल्सीअसच्या पुढे गेले आहे. असह्य उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. गुरुवारी सकाळपासून वातावरणात कमालीची उष्णता होती. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला. सायंकाळी चारच्या सुमारास सोसाट्याचे वारे सुरु झाले. पाठोपाठ जोरदार पावसाने हजेरी लावली. पाच वाजेपर्यंत पाऊस व सोबतच सोसाट्याने वाहणारा वारा अशी स्थिती शहरात होती.
अचानक जोरदार पाऊस झाल्याने कोणतीही पूर्वतयारी न करता घराबाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी दैना उडाली. अनेकांना पावसात भिजावे लागले.
आठवडे बाजाराची दैना
आठवडे बाजाराच्या दिवशी शहरात अचानक जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मंडईमध्ये शुकशुकाट जाणवला. तालुक्यातील अनेक शेतकरी गुरुवारी आपला शेतमाल घेऊन मंडईबाहेर विक्रीसाठी बसतात. धुंवाधार पावसामुळे शेतमाल झाकताना त्यांना मोठी कसरत करावी लागली. छोटे-मोठे व्यापारी, भाजीपाला, हातगाडीवर फळे विक्री करणाऱ्यांचे अचानक आलेल्या पावसामुळे बांधलेल्या पालाचे व मालाचे मोठे नुकसान झाले. मागील दोन दिवसांपासून वातावरणात प्रचंड उष्णता वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. तर आजच्या पावसाच्या सरींनी वातावरणात गारवा पसरल्यावर नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.