कोल्हापूर, पुढारी डेस्क : कोकण आणि विदर्भासह राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक भागांत पूरस्थिती आहे. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्या 14 तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराने वेढा दिल्यामुळे 45 ग्रामस्थ अडकले आहेत. त्यांच्या बचावासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. दोन्ही जिल्ह्यांतील धरणे तुुडुंब भरल्याने पूरस्थिती कायम आहे. कुंभार्ली घाट, परशुराम घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार सुरूच आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भात गेल्या 48 तासांत पावसाचे 8 बळी झाले असून, 30 वर नागरिक जखमी झाले आहेत. राज्यात दोन दिवसांतील पाऊस बळींची संख्या 60 झाली आहे.
दरम्यान, पावसाची गती वाढणार असून, पुढील पाच दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि कोकणात (दक्षिण कोकण) अतिवृष्टी ते मुसळधार पाऊस बरसणार आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
रत्नागिरीत पावसाचा जोर कायम
रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच पावसाने चांगला जोर धरला. उत्तर भागात सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे झुकल्याने कोकण किनारपट्टी भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पावसाचा जोर 23 जुलैपर्यंत कायम राहणार आहे.
खेडमध्ये मानवी वस्तीत मगर
खेड-दापोली मार्गावरील जिजाऊ भाजी मंडईच्या आवारात शुक्रवारी एक 9 फुटी मगर पाण्यातून आली होती. ही मगर आल्यानंतर पोलिसांकडून वन विभागाला कळविण्यात आले. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले. त्यांनी या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
मुंबईत 24 तासांत पूर्व व पश्चिम उपनगरांत पावसाचा विक्रम!
मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पूर्व व पश्चिम उपनगरांत पावसाने विक्रम केला आहे. शुक्रवारी सकाळी 8 ते शनिवारी सकाळी 8 या 24 तासांत वांद्रे परिसरात तब्बल 213 मि.मी., तर घाटकोपरमध्ये 199 पावसाची नोंद झाली. अन्य भागांतही 150 मि.मी.पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
पावसाने पश्चिम व पूर्व उपनगरांत विक्रमी बॅटिंग केली. 26 जुलै 2005 मध्ये अशाप्रकारे उपनगरांत विक्रमी पाऊस झाला होता. शुक्रवार सकाळपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे 24 तासांत वांद्रे पश्चिम येथे 213 मि.मी. पावसाची नोंद झाली. केवळ वांद्रेत नाही, तर पश्चिम उपनगरातील तब्बल नऊ भागांत 100 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाला.
यवतमाळमध्ये 14 तालुक्यांत अतिवृष्टी
यवतमाळ : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू आहे. अनेक तालुक्यांत अतिवृष्टी झाली. हवामान खात्यानेही रेड अलर्ट जारी केला होता. मात्र, शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने रौद्ररूप धारण केले. 16 पैकी तब्बल 14 तालुक्यांत अतिवृष्टी झाली. यवतमाळ तालुक्यात कधी नव्हे एवढा म्हणजे 236, तर महागाव तालुक्यात 131 मि.मी. पाऊस कोसळला. अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले. ग्रामीण भागामध्ये पूरसद़ृश स्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी भीतीपोटी छतावर चढून रात्र काढली.
मुलींना वाचविताना आईचा मृत्यू
यवतमाळलगतच्या वाघाडी नदीला पूर आला. नदीचे पाणी वाघाडी वस्तीत शिरले. घरात पुराचे पाणी येत असताना दोन चिमुकल्या मुलींना घराबाहेर काढल्यानंतर आईच्या अंगावर पत्र्याचे घर कोसळले. पाणी वाढल्याने महिलेला बाहेर पडता आले नाही, यात तिचा मृत्यू झाला. शालू रवींद्र कांबळे (वय 35, रा. वाघाडी) असे मृत महिलेचे नाव आहे.
अकोल्यात एकजण वाहून गेला
अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी नदीच्या पुरात एकजण वाहून गेला. अंकित ठाकूर असे या तरुणाचे नाव आहे. आणखी एकजण वाहून गेला असून, शोधकार्य सुरू होते.