Latest

पुणे: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, निमगाव केतकी परिसरात पाच ठिकाणी पडली वीज

अमृता चौगुले

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा: इंदापूर तालुक्यात गुरुवारी (दि. १३) झालेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये निमगाव केतकी परिसरातील मदन कांतीलाल पाटील यांच्या दुभत्या गायींवर अचानक वीज कोसळल्याने एक गाय जागीच मृत्युमुखी पडली तर एक गाय जखमी झाली आहे. शेंडे मळा येथे झाड पडून चार चाकीसह शेती अवजाराचे नुकसान झाले आहे.

या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके मका, गहू, हरभरा  पाळीव जनावरांसाठी केलेला घास, आंबा, केळी, पेरू, जांभूळ, नारळ, भाजीपाला, फुल शेती आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डाळिंब द्राक्ष आणि आंब्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

निमगावातील शेंडे मळा येथील पिराजी शेंडे यांच्या दारातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली. तसेच कुंभारमळा- गुजरमळ्यात  नारळाच्या झाडावर वीज पडली. खोरी वस्तीवर ज्ञानदेव भैरू भोंग यांच्या घरासमोर शेततळ्याच्या शेजारी वीज कोसळली. तसेच बुनगेवस्ती येथे दत्तात्रय बुनगे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावरही वीज पडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. शेंडे मळा येथील तुकाराम अर्जुन शेंडे यांच्या चारचाकी बोलेरो गाडीवर व शेजारीच असलेल्या ट्रॅक्टरच्या ब्लोअरवर लिंबाचे मोठे झाड वादळी वाऱ्यात कोसळले. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान दत्तु बरळ यांच्या शेतातील नारळाची दोन व आंब्याची दोन झाडे वाऱ्यात उन्मळून विजेच्या तारेवर पडली.

तीन महिन्यांपूर्वी माढा (जि. सोलापूर) येथून दीड लाख रुपयांना गाय खरेदी करून आणली होती. दुसऱ्या वेताची ही गाय तीन महिन्याची गाभण होती. सध्या ती २० लिटर दुध देत होती. एकूण १४ गायांपैकी एक गाय दगावल्याने दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे मदन पाटील यांनी सांगितले.

गावातील जिल्हा बँकेच्या शाखेजवळ विजेच्या खांबावर झाडाच्या फांद्या पडल्या. साठेनगरमध्ये समाज मंदिराशेजारी विजेची तार तुटली आहे. तसेच कौठीचामळ्यात विजेचा खांब कोसळला. भिवईमळ्यात विजेच्या तारांवरच सुबाभूळ कोसळल्याने गावासह वाड्यावर गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता वीज पुरवठा खंडित झाला, तो शुक्रवारी सकाळी साडेबारा वाजता सुरू झाला. जवळपास १६ तास विज गायब झाली होती. रात्र नागरिकांना अंधारात काढावी लागली.

द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी ही धास्तावला आहे. शासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत घोषित करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

दरम्यान अवकाळी पाऊस व वीज कोसळण्याची माहिती मिळताच गाव कामगार तलाठी गोरक्षनाथ इंगळे, पोलीस पाटील अतुल डोंगरे, संतोष जाधव यांनी पंचनामे केले तर  पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मारुती काजळे, डॉक्टर अशोक काळे यांनी तातडीने  गायीचे शवविछेदन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT