Latest

Global Warming : आगामी पाच वर्षांमध्ये जगभरात वाढणार उकाडा

Arun Patil

वॉशिंग्टन : सध्या अवघ्या जगालाच जागतिक तापमानवाढीचे चटके बसत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक हवामान संघटनेच्या वतीने ग्रीन हाऊस गॅसेस आणि अल निनोचा परिणाम जागतिक तापमानवाढीवर होणार असल्याचा सतर्कतेचा इशारा दिला. पुढील पाच वर्षांमध्ये म्हणजेच 2023 ते 2027 दरम्यानच्या काळात भीषण उकाडा जाणवेल असा इशाराच दिल्यामुळे आता संपूर्ण जगाचेच भवितव्य उष्णतेच्या झळा सोसणार, हे स्पष्ट होत आहे.

संघटनेने दिलेल्या माहितीनुसार 2015 ते 2022 ही आतापर्यंतची सर्वात उष्ण वर्षे गणली गेली होती; पण हवामान बदलामुळे वातावरणात सातत्याने मोठे बदल झाले आणि तापमानाचा आकडा मोठ्या फरकाने वाढू लागला. परिणामी, पुढच्या 5 वर्षांमध्ये विक्रमी तापमानाची नोंद केली जाऊ शकते असा इशारा जागतिक हवामान संघटनेने दिला. फक्त भारतातच नव्हे, तर सध्या जगातील इतरही देश वाढत्या तापमानाने हैराण आहेत.

यामध्ये अल निनोचा प्रभावही मोठी भूमिका बजावत असल्याचे मत हवामानतज्ज्ञ मांडतात. 'अल निनो' हा सागरी प्रवाह असून त्याचा मान्सूनवर परिणाम होतो. पेरूसह चिली देशाच्या किनारपट्टीवर या परिणामांची तीव्रता अधिक असते. हा पाण्याखालील प्रवाह विषुववृत्तावरून पाण्यावर आल्यास पृथ्वीवरील हवामानावर याचे परिणाम होतात.

हवामान संघटनेच्या पाठोपाठ अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था 'नासा'कडूनही अतिशय गंभीर स्वरूपातील निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. 'नासा'कडून 'सेंटिनेल-6 मायकेल फ्रिलिश' या उपग्रहातून पृथ्वीवर वाहणार्‍या उष्णतेच्या लाटांचे वास्तव समोर आणले गेले. याच लाटा पुढे जाऊन अल निनोमध्ये प्रभावित होत असून सध्या त्या पॅसिफिक महासागरातून भारताच्या दिशेने सरकताना दिसत आहेत. समुद्रात उसळणार्‍या या उष्णतेच्या लाटांची उंची कमाल 4 इंच असली, तरीही त्यांची रुंदी मात्र प्रचंड असल्याचे म्हटले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT