पुढारी ऑनलाइन डेस्क : Heatwave Death in Bihar : बिहारमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे 24 तासांत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारच्या शेखापुरात गेल्या 44 तासांत सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमान, तर पाटणा येथे 43.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. हवामान खात्याने शनिवारी दक्षिण-पश्चिम बिहारच्या सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, 12 दक्षिण जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि नऊ अतिरिक्त भागात रविवारपर्यंत पिवळा अलर्ट जारी केला.
औरंगाबाद, रोहतास, भोजपूर, बक्सर, कैमूर आणि अरवाल हे जिल्हे उष्णतेच्या लाटेमुळे सर्वाधिक प्रभावित जिल्हे आहेत. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. पाटणा, बेगुसराय, खगरिया, नालंदा, बांका, शेखपुरा, जमुई आणि लखीसराय यांना ऑरेंज अलर्ट मिळाला आहे. तर पूर्व चंपारण, गया, भागलपूर, जेहानाबाद आणि पूर्व चंपारणमध्ये पिवळा अलर्ट प्राप्त झाला आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे भोजपूर जिल्ह्यात सर्वाधिक 6 जणांचा मृत्यू झाला आहे. रोहतासमध्ये दोन आणि नालंदा, जमुई, गया आणि पाटणा येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
पुढील ४८ तासांत कमाल तापमानात घट होण्याची शक्यता नसल्याचे हवामान अधिकाऱ्यांनी सांगितले आहे आणि लोकांनी जास्त वेळ उन्हात घालवण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय, राज्याच्या दक्षिणेकडील भागात उष्णतेच्या लाटेच्या अंदाजामुळे, पाटणा जिल्हा दंडाधिकारी चंद्रशेखर सिंग यांनी सर्व शाळा आणि अंगणवाडी सुविधा 24 जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर 20 जून रोजी शाळा पुन्हा भरणार होत्या, परंतु काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देऊन, जिल्हा प्रशासनाने 24 जूनपर्यंत सुट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा :