Latest

‘शिंदे हटाव’च्या हजेरीपटावर शिंदेंच्याच २३ आमदारांच्या सह्या

दिनेश चोरगे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील सुनावणीत खळबळजनक खुलासे होत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात 'एकनाथ शिंदे हटाव'च्या बैठकीला हजेरी लावणारे आमदार पुढे शिंदे सेनेत सामील झाले. त्यामुळे त्या बैठकीच्या हजेरीपटावरील सह्या आधीच घेण्यात आल्या होत्या, त्या बोगस सह्या असल्याची सारवासारव करण्याची वेळ शिंदे गटाच्या आमदारांवर आली आहे.

शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे आणि योगेश कदम यांची उलटतपासणी घेतली. जवळपास 6.5 तास चाललेल्या उलटतपासणीत लांडे यांना 116 तर कदम यांना 77 प्रश्न केले गेले. या उलटतपासणी दरम्यान कामत यांनी 21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावरील आमदारांच्या बैठकीचा हजेरीपटच समोर आणला. एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या गटनेतेपदावरून हटविण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला होता. या बैठकीच्या हजेरीपटावर शिवसेनेच्या 23 आमदारांच्या सह्या आहेत, जे पुढे शिंदे सेनेत सहभागी झाले. यावरून देवदत्त कामत यांनी आज दिलीप लांडे आणि योगेश कदम यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. हजेरीपटासह पक्षादेश, प्रतिज्ञापत्रांवरील सह्यांचे दाखले दिले. त्यावर हजेरीपटावर सही आपली असली तरी आमदारांच्या सह्या आधीच घेण्यात आल्याचे उत्तर आमदार लांडे यांनी दिले. तर ही सही माझ्या सहीसारखी दिसते. मात्र अशा कोणत्या कागदपत्रावर आपण सही केल्याचे आठवत नसल्याचे आमदार योगेश कदम यांनी आपल्या उलटतपासणीत सांगितले. इतर ठिकाणच्या सह्या मात्र आपल्या नाहीत, बोगस आहेत, असे आमदार कदम यांनी सांगितले.

आजच्या सुनावणीत सुनील प्रभू आणि भरत गोगावले यांच्याकडून जारी झालेल्या व्हिपचा मुद्दाही आला. प्रभू यांचे व्हिप मिळाल्याचे आठवत नसल्याचे सांगतानाच विधानसभा अध्यक्ष निवड आणि शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी झालेल्या मतदानात कोणताच पक्षादेशाचे उल्लंघन केले नाही. आम्हीच शिवसेना होतो आणि आम्हीच शिवसेना आहोत, असा दावा अधोरेखित करण्याचा प्रयत्न लांडे आणि कदम यांनी आपल्या उत्तरातून केला.

वर्षावरील बैठकीत या आमदारांच्या सह्या

वर्षावरील या बैठकीच्या या हजेरीपटावर दीपक केसरकर, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संतोष बांगर, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, योगेश कदम यांच्यासह आता शिंदे गटात असलेल्या 23 आमदारांच्या सह्या आहेत.

पुन्हा सुरत-गुवाहाटी आणि उलटसुलट दावे

आजच्या सुनावणीत शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरत आणि गुवाहाटी दौर्‍यावरून ठाकरे गटाच्या वकिलांनी उलटसुलट प्रश्नांचा मारा केला. त्यावर लांडे आणि कदम यांनी वेगवेगळी उत्तरे देत चकवा देण्याचा प्रयत्न केला. सुरत-गुवाहाटी दौर्‍याच्या प्रश्नावर दिलीप लांडे यांनी ही माझ्या खासगी जीवनातील बाब असल्याचे सांगत अधिक काहीही सांगण्यास नकार दिला. शिवाय महाराष्ट्राबाहेर मी रिक्षा चालवत गेलो किंवा बैलगाडीने गेलो हे सांगू शकत नाही, असेही सुनावले. योगेश कदम यांनी मात्र आपण सुरतला आणि गुवाहाटीला गेल्याचे कबूल केले. मात्र गुवाहाटीत किती दिवस होतो, मुंबईत कधी आलो हे आठवत नाही. शिवाय गुवाहाटीत कोणत्या हॉटेलमध्ये राहिलो त्याचे नावही आठवत नसल्याची साक्ष कदम यांनी दिली. मात्र, या दौर्‍याचा खर्च कोणी केला या प्रश्नावर खासगी बाब असल्याचे सांगत उत्तर देण्यास साफ नकार दिला. गुवाहाटीत एकनाथ शिंदेंसोबत एकूण 39 आमदार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT