Latest

Health : जाणून घ्या, मेंदूचा आजार ‘मॅनिनजायटिस’ व त्याचे प्रकार

दिनेश चोरगे
  • डॉ. अतुल कोकाटे

मॅनिनजायटिस ही व्याधी मेंदूशी संबंधित असते. मेंदूभोवती जे वेष्टन असते, त्या वेष्टनावर इन्फेक्शनमुळे सूज येते. काही वेळा ही सूज आपोआप काही दिवसांनंतर कमी होते. मात्र ही सूज जर कमी झाली नाही, तर रुग्णाच्या द़ृष्टीने ती स्थिती मोठी कठीण असते.

मॅनिनजायटिस या व्याधीचे तीन प्रकार सांंगितले जातात. व्हायरल मॅनिनजायटिस, फंगल मॅनिनजायटिस आणि बॅक्टेरिअल मॅनिनजायटिस. या सर्व प्रकारच्या मॅनिनजायटिसची प्रारंभीची लक्षणे जवळपास सारखीच असतात. खूप ताप येणे, मान आखडणे, डोके दुखणे अशी प्रारंभिक लक्षणे या व्याधीमध्ये जाणवतात.

व्हायरल मॅनिनजायटिस : मॅनिनजायटिस ही व्याधी होण्याचे मुख्य कारण म्हणजे व्हायरल इन्फेक्शन. अनेक लोकांमध्ये इन्फेक्शनचे प्रमाण खूपच अल्प असते. या रुग्णांवर अनेकदा उपचार करण्याची वेळ येत नाही. ज्यांच्या शरीरात प्रतिकारशक्ती कमी आह; वृद्ध नागरिक, लहान मुले यांना असे व्हायरल इन्फेक्शन झाले तर उपचाराबाबत हेळसांड करू नये.

फंगल मॅनिनजायटिस : फंगल इन्फेक्शनमुळे मॅनिनजायटिस होण्याचा धोका खूप कमी असतो. असा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे संक्रमित होत नाही. मात्र ज्यांची प्रतिकारशक्ती खूपच कमी असते, अशांना फंगल इन्फेक्शनची बाधा होऊ शकते. कर्करोग आणि एचआयव्ही पीडित व्यक्तींना फंगल इन्फेक्शन होण्याचा सर्वाधिक असतो. या संसर्गाचा उपचार अ‍ॅण्टीफंगल औषधांद्वारे केला जातो. यासाठी रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते.
अशा प्रकारचा मॅनिनजायटिस बॅक्टेरियामुळे होतो. अनेकदा बॅक्टेरिया रक्तात मिसळतात आणि मेंदू आणि मणक्याच्या सुरक्षा आवरणावर जाऊन पोहोचतात. सायनस इन्फेक्शन अथवा कानात झालेला संसर्ग यामार्गेही बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतात. या इन्फेक्शनवर तातडीने उपचार करावे लागतात; अन्यथा हे इन्फेक्शन प्राणघातक ठरण्याची शक्यता असते.

अ‍ॅण्टीबायोटिक्स औषधांद्वारेच या इन्फेक्शनवर उपचार केले जातात. लहान मुलांना बॅक्टेरिअल मॅनिनजायटिस होण्याची शक्यता सर्वाधिक असते. कारण लहान वयात शरीराची प्रतिकारशक्ती कमी असते. मध्यम वयाच्या तसेच तरुण आणि वृद्ध मंडळींनाही या प्रकारचे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. ज्यांना संसर्गजन्य आजार झालेले आहेत, अशा व्यक्तींच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्यावर बॅक्टेरिअल मॅनिनजायटिस होण्याची शक्यता असते. ज्या सार्वजनिक ठिकाणी खूप गर्दी असते, म्हणजे बसस्थान, रेल्वे स्थानक, सार्वजनिक सभा, चित्रपट गृहे, नाट्यगृहे अशा ठिकाणी संसर्गाचा फैलाव होण्याची शक्यता असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT