कॅलिफोर्निया : खरं तर अमर होण्याची इच्छा जवळपास प्रत्येकाला असते. अमेरिकन अब्जाधीश ब्रायन जॉन्सन हे महाशयदेखील याला अपवाद नाहीत. पण, ब्रायननी थोडा अधिकच कहर केला असून सध्याचे शतक पूर्ण होईतोवर जिवंत रहायचे यासाठी त्यांनी अनेक अट्टाहास सुरू केले आहेत. एकीकडे, आपल्या डाएटमध्ये बदल केले आहेतच. शिवाय, वय वाढू नये यासाठी रोज चक्क 110 गोळ्या घेण्याचा रतीबच ते घालत आहेत!
आता आहारात बदल करून रोज 110 गोळ्या घेण्यावरच हे महाशय अजिबात थांबलेले नाहीत. कारण कहर म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्वत:ला आणखी तरुण करण्यासाठी आपल्या मुलाचे रक्त चढवले होते. रोज एकाच वेळी झोपी जायचे, सकाळी 11 नंतर काहीही खायचे नाही, असे अनेक दंडक त्याने स्वत:ला लावून घेतले आहेत.
सीईओ पॉडकास्टमध्ये बोलताना 45 वर्षीय ब्रायनने आपल्या दिनचर्येचा उल्लेख केला. जो पृथ्वी तलावर येतो, त्याला एक दिवस आपले प्राण सोडावेच लागतात, असे जे म्हटले जाते, ते आपल्याला खोटे असल्याचे सिद्ध करायचे आहे, असे तो म्हणतो. नेहमी जिवंत राहणे हे निश्चितच शक्य आहे. मी माझे सर्व निर्णय एल्गोरिदमच्या मदतीने घेतो. मी माझ्या मेंदूला निर्णय घेण्याचा अधिकार देत नाही. मला जे करायचे आहे, ते आदेश मी स्वत: देतो. याशिवाय, सर्वात महत्त्वाची असते ती झोप. मी झोपेची गुणवत्ता मोजत असतो.
ब्रायन रोज रात्री साडेआठ वाजता झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतर पहिले 4 ते 5 तास तो कोणाशी काहीही बोलत नाही. यामुळे विचार करण्याची क्षमता वाढते, असे तो म्हणतो. आहारात तो दिवसभरात 2250 कॅलरी घेतो आणि हा पूर्ण शाकाहार असतो. आहार पचवण्यासाठी सहा ते आठ तास लागतात. त्यामुळे सकाळी 6 ते 11 या वेळेव्यतिरिक्त तो काहीही खात नाही. ब्रोकोली, लसूण, आले, कोको त्याच्या आहारात असते. दिवसभरात तो एक किलो भाज्या खातो आणि गोड खाण्याचा मोह टाळण्यासाठी डार्क चॉकलेट पसंत करतो. आता अमर राहण्याचा हा वसा त्याला कुठवर नेणार, याचेच थोडेफार औत्सुक्य असणार आहे.