Latest

हवेली बाजार समिती निवडणुक : अजित पवारांची घोषणा प्रत्यक्षात येणार का?

अमृता चौगुले

सीताराम लांडगे

लोणी काळभोर : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात 'मोकळीक दिली तर कितीही पॅनेल तयार होतील' या विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या घोषणेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पॅनेल उभे करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचा इशारा पवारांनी दिल्याने ही घोषणा प्रत्यक्षात उतरणार का? याची कुजबूज पक्षात सुरू झाली आहे. हवेली तालुक्यातील राजकीय इतिहास पाहता निष्ठावंतांपेक्षा बंडखोरांना अजित पवारांनी पाठबळ दिल्याचे अनेकवेळा दिसले असल्याने ही कुजबूज सुरू झाली आहे.

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक मंडळाची निवडणूक तब्बल एकोणीस वर्षांनंतर होत आहे. राष्ट्रवादीचे पॅनेल उभे करण्याबाबत भूमिका गुलदस्त्यात होती, त्यामुळे पक्षाच्या तालुक्यातील नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होती. राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांच्या आग्रहाखातर अखेर निवडणुकीची भूमिका ठरवण्याबाबत पुण्यात मेळावा आयोजित केला गेला. या मेळाव्यात 'मोकळीक दिली तर कितीही पॅनेल तयार होतील म्हणजेच पक्षाचा पॅनेल होणारच असा अप्रत्यक्ष इशाराच तालुक्यातील नेत्यांना अजित पवारांनी दिला आहे.

पवारांच्या डरकाळीनंतर कार्यकर्त्यांमध्ये थोड्या काळापुरता तरी उत्साह निर्माण झाला, परंतु हा उत्साह कायम राहील का ? हे आगामी काळात पहावयास मिळेल. हवेली तालुक्यातील राजकीय इतिहास पाहता अजित पवारांच्या वेगवेगळ्या निवडणुकीत वेगवेगळ्या भूमिका राष्ट्रवादीच्या तालुक्यातील नेत्यांसह जनतेने पाहिल्या आहेत. पवारांची भूमिका नेहमीच संभ्रमावस्थेची राहिल्याने कायमच तालुक्यातील राष्ट्रवादीला बंडाळीचे ग्रहण लागले. राष्ट्रवादीचे काही नेते पक्षात राहून अजित पवारांचे विश्वासू राहिले तर काही बंडखोरी करून अजित पवारांच्या विशेष मर्जीतील राहिले, त्यामुळे अनेक नेत्यांनी अजित पवारांच्या दुटप्पी भूमिकेला कंटाळून राष्ट्रवादीला राम राम ठोकून भाजपाचा रस्ता धरला.

हवेली तालुक्यातील सहकाराला अजित पवारांनी कधीच बळकटी दिली नसल्याचा इतिहास आहे. सहकारातील राजकारणात प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या भिन्न भूमिका कार्यकर्त्यांनी पाहिल्या आहेत. पवारांनी ताकद न दिल्याने हवेली तालुक्यातील सहकार क्षेत्र जवळ जवळ संपुष्टात आले. 'जो निवडून येईल तो आमचा व मैत्रीपूर्ण लढत' हे धोरण कायमच अजित पवारांनी तालुक्यातील निवडणुकात राबिल्याने राष्ट्रवादीलाच अनेक दिग्गज नेत्यांनी आव्हान दिल्याचे दिसते. अनेक वर्षांपासून बंडखोरीची लागण तालुक्यात सुरू आहे व पक्षाने कधीही पक्ष विरोधी काम केले म्हणून कुणावरही कारवाई केली नाही. अजित पवारांचे बंडखोरांना पाठबळ असल्याचे अनेकवेळा दिसले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर हवेलीत अनेकांनी खुलेआम पक्षाच्या विरोधात काम केल्याचे जिल्ह्याने पाहिले. पक्षाचा 'व्हीप' धुडकावून पक्षाच्या विरोधात मतदान केले असल्याचे तालुक्याने पाहिले तरीही पक्षाकडून कोणतीही कारवाई नाही, उलट बक्षिसी दिल्याचे पाहिले. एकाच अपवादात्मक घटनेत अजित पवारांनी दखल घेतली व पक्षाला मदत केली म्हणून सनी काळभोर यांना पंचायत समितीचे उपसभापतीपद दिले, त्यासाठीही ज्येष्ठ नेते माधव काळभोर व महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांना मोठी ताकद लावावी लागली असा राजकीय इतिहास हवेली तालुक्यात राष्ट्रवादीचा आणि अजित पवार यांचा राहिला आहे.

अजित पवार यांची खरोखरच बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पॅनेल उभा करण्याची मानसिकता आहे का, नेहमीप्रमाणे ऐनवेळी पक्षाला नेहमी चुना लावणार्‍या बंडाळींच्या सुरात सूर लावून निष्ठावंतांच्या तोंडाला पाने पुसणार अशी शंका त्यामुळेच नेत्यांमध्ये आहे. अजित पवारांच्या मनात पॅनेल उभा करण्याचा खरंच इरादा असेल तरच राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांना न्याय मिळेल अन्यथा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसवरचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये राहणार नाही हे नक्की असे सध्या तरी चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT