Lok Sabha Election 2024

पंतप्रधान मोदी यांची सभा विराट होणार; पालकमंत्री मुश्रीफ यांचा विश्वास

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी (दि. 27) कोल्हापुरातील तपोवन मैदानावर सायंकाळी 5 वाजता सभा होत आहे. महायुतीला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने आणि पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे सुमारे दोन लाख लोकांची ही विराट सभा होईल, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

सभेच्या तयारीसाठी पॅव्हेलियन हॉटेलमध्ये महायुतीतील पक्षांच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसनशील भारत ही ओळख पुसून विकसित भारत हा नवा लौकिक निर्माण केला आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचे आणि भारतवासीयांना कल्याणकारी योजना देण्याचे मोठे कार्य केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचे खा. संजय मंडलिक व खा. धैर्यशील माने हे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.

खा. धनंजय महाडिक म्हणाले, कोल्हापुरात होणारी पंतप्रधान मोदी यांची सभा ऐतिहासिक होईल. महायुतीमधील सर्व नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी ही अतिविराट सभा यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी महायुतीतील सर्वच घटकांनी समन्वयाने तालुकानिहाय नियोजन करावे.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. संजय मंडलिक, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खा. धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, शाहू ग्रुपचे समरजित घाटगे, माजी आ. के. पी. पाटील, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर व धैर्यशील देसाई, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे, सम—ाट महाडिक, भूषण पाटील, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास, भाजपचे विजय जाधव, शिवसेना शहराध्यक्ष सुजित चव्हाण, विजय जाधव, पी. जी. शिंदे, अशोकराव चराटी, डॉ. संजय पाटील, बाबासाहेब पाटील, एम. पी. पाटील, संतोष धुमाळ, सोमनाथ घोडेराव आदी प्रमुख उपस्थित होते.

हे षड्यंत्र दिसते..!
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, वैयक्तिक बदनामी, वादग्रस्त वक्तव्ये आणि चुकीचे आरोप यासारखे मुद्दे टाळले पाहिजेत. आरोप-प्रत्यारोपांमुळे या बाजूकडून शाहू महाराज यांच्यावर टीका होईल, असेच हे षड्यंत्र दिसते. कोणाकडून जर धमकीसारखा चुकीचा प्रकार होत असेल तर संबंधितांनी पोलिसांत जाऊन तक्रार द्यावी. त्यासाठी हातात काठी घेऊन बसण्याची काय गरज आहे, असा टोला आ. सतेज पाटील यांना त्यांचे नाव न घेता लगावला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT