Latest

राहुरी : अवैध वाळू उपसा करणार्‍यांना ‘सुगीचे दिवस’

अमृता चौगुले

रियाज देशमुख

राहुरी : राहुरी महसूल विभागाने अवैध गौण खनिज उपशाला घातलेल्या बंदीला शिथिल कोणी केले? वाढलेल्या वाळू तस्करीनंतर वाळू उपसा करणार्‍यांना सुगीचे दिवस आले आहे. पूर्वीपेक्षा तीप्पट दर अदा करीत वाळू खरेदी होत असल्याची चर्चा आहे. दरवाढ करण्यासाठीच मध्यंतरी अवैध गौण खनिज उपशावर बंदी घातली होती का?असा प्रश्न निर्माण केला जात आहे.

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवैध गौण खनिजाबाबत अत्यंत धोरणात्मक निर्णय घेत जिल्हा महसूल प्रशासनाला अवैध गौण खनिज बाबत कारवाईचे आदेश दिले होते. महसूल प्रशासनासह पोलिस प्रशासनाने कारवाईचा बडगा हाती घेत अवैध गौण खनिज वाहतुकीला पुर्णपणे निर्बंध लादले होते. राहुरी परिसरात मुळा व प्रवरा हे दोन्ही नदीपात्र असूनही वाळू तस्करांची चांगलीच गोची झाली होती. दरम्यान, गेल्या महिन्यापासून राहुरी हद्दीत अवैध वाळू उपशाला प्रारंभ झाल्याचे चित्र आहे.

मुळा नदी पात्रातील बारागाव नांदूर, डिग्रस, तांदूळवाडी, कोंढवड, मानोरी, आरडगाव, वळण, देसवंडी, खडांबे आदी शिवारातून वाळू वाहनांची रेलचेल सुरू झाल्याची चर्चा आहे. प्रवरा पात्रातही सोनगाव, सात्रळ, पाथरे, लाख, जातप हद्दीतून वाळू उपशाला प्रारंभ झाल्याचे दिसत आहे. मुळा व प्रवरा नदी पात्रातून पुन्हा वाळू उपसा होत असताना महसूल प्रशासनाकडून वाळू तस्करांना मोकळीक दिल्याची चर्चा आहे.

महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून गौण खनिज कारवाईचे कडक धोरण आत्मसात केले जात असताना काही महसूलचे 'रक्षकच' नदी पात्राचे 'भक्षक' झाल्याची चर्चा आहे. डिग्रस हद्दीमध्ये कार्यरत असणार्‍या एका महसूल रक्षकाकडून तस्करांना टीप देण्याचे काम होत असल्याचे बोलले जात आहे. परिणामी महसूलचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी छापा टाकूनही संबंधित अधिकार्‍यांना हात हलवत परतावे लागल्याचे अनेकदा घडले आहे.

मुळा नदी पात्रातील डिग्रस व बारागाव नांदूर हद्दी दरम्यान, असलेल्या केटीवेअर परिसरात अक्षरशः वाळू तस्करांनी नदी पात्रामध्ये विहीरीप्रमाणेच खोदकाम केले आहे. डिग्रस, राहुरी खुर्द हद्दीमध्ये काही जणांना नदी पात्रातील खड्यांमुळे जीव गमवावा लागला आहे. अशी परिस्थिती असतानाही महसूल प्रशासनातील तो 'रक्षक' का भक्षक झाला? याबाबत तहसीलदार व वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

यासह मुळा व प्रवरा पात्रातील इतर नदीपात्र पट्यातही वाळू तस्करांनी धंद्याला जोर दिला आहे. महसूल प्रशासनाची बंदी शिथिल झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, बंदी शिथिल झाल्यानंतर वाळू तस्करांनी अव्वाच्या सव्वा दराने वाळू विक्री करून बक्कळ पैसा कमविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वाळू तस्करांनी पूर्वीपेक्षा तीप्पट दर वाढ केल्याचे सांगितले जात आहे.

डिग्रस हद्दीमध्ये जुजबी कारवाया
डिग्रस हद्दीमध्ये महसूल तसेच पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केलेली आहे. सध्याही कारवाई होत आहे. मात्र डंपर, जेसीबी व पोकलॅन हाती लागल्यानंतर 'त्या' महसूल रक्षकांनी महसूल कार्यालयापर्यंत केलेली कारवाई पोहोचू न दिल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. केवळ जुजबी कारवाई करून मोठी कारवाई केल्याचे चित्र रंगविण्यात येत आहे.

वाळू नसल्याने शासकीय कामे बंद
राहुरी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी वाळू बंदीचे कडक धोरण आत्मसात केल्यानंतर शासकीय बांधकाम बंद पडले. सर्वसामान्य नागरीकांचे शासकीय घरकूल कामे व शौचालय बांधकाम बंद पडले. परंतु धनदांडग्यांकडून पूर्वीपासून तीप्पट दर घेत वाळू पुरवठा सुरळीत झाल्याचे बोलले जात आहे. डिग्रस हद्दीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असताना तेथील महसूल रक्षकाचे अभय वाळू तस्करांना का? याबाबत चर्चेला ऊत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT